मुंबई: राज्याच्या २९ व्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले आहे. काल गुरुवारी २८ रोजी शिवाजी पार्क येथे त्यांचा भव्यदिव्य शपथविधी सोहळा पार पडला. आज शुक्रवारी त्यांनी मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून पदभार घेतले. त्यांच्या स्वागतासाठी मंत्रालयात जय्यत तयारी करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे उपस्थित होते. पदभार स्वीकारण्यासाठी आले असताना त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते उपस्थित उपस्थित होते.
काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच राज्यातील शेतीचे झालेले नुकसानीची माहिती मागविली असून माहिती आल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
राज्याच्या राजकीय घडामोडी पाहता, एकाच आठवड्यात दोनदा दोन वेगवेगळे नेते मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. २५ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार घेतला होता. त्यानंतर लगेचच त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे.