मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणारे अहमदनगरचे नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्यावर महाविकास आघाडी सरकारने मोठी कारवाई केली आहे. महापुरुषांबद्दल अपशब्द काढल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
२०१८ मध्ये अहमदनगरच्या उपमहापौरपदावर असताना श्रीपाद छिंदमने फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारले होते. त्यानंतर छिंदमविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. जनक्षोभ पाहून छिंदमकडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेण्यात आला होता. तसेच त्याची भाजपामधूनही हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे नगरसेवकपदही रद्द करण्याचा ठराव अहमदनगरच्या महानगरपालिकेत पारीत करण्यात आला होता. त्यानंतर छिंदम २०१८ मध्ये झालेली अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक अपक्ष निवडून आले.