शिवरी बाह्यवळणाला शेतकर्‍यांचा विरोध

0

खळद, शिवरी ग्रामसभेचे ठराव

खळद : शिवरी (ता. पुरंदर) येथील पालखी महामार्गावर प्रस्तावित असणार्‍या बाह्यवळणाला शेतकर्‍यांनी विरोध केला आहे. तसेच खळद व शिवरी या गावच्या ग्रामसभेने बाह्यवळण विरोधात ठराव मंजूर केला आहे. बाह्यवळणामुळे येथील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकरी गेले कित्येक दिवस याच्या विरोधात लढा देत आहेत. या लढ्यास या ग्रामसभेच्या ठरावामुळे बळ आले आहे. याबाबत खळद व शिवरी गावच्या शेतकर्‍यांनी गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात प्रकल्प अधिकारी सुहास चिटणीस यांची भेट घेऊन त्यांना हे ठराव दिले. यावेळी या शेतकर्‍यांनी शिवरी येथे बाह्यवळण करू नये, यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार असल्याचे सांगितले.

यमाई माता मंदिराला बाधा नाही…

यमाई माता मंदिराला कोणतीही बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घेत रस्ता बनवावा. यासाठी शासनाने ज्याप्रमाणे घाट मार्ग रुंदीकरण केले जाते. त्याप्रमाणे येथे ही त्याप्रमाणे काम करावे, अशी मागणी केली. यावेळी यावेळी पुरंदर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे, नवनाथ एकनाथ कामथे, उदय गायकवाड, नवनीत कादबाने, गोरख कादबाने, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सुहास चिटणीस यांनी शेतकर्‍यांनी दिलेले ग्रामसभेचे ठराव वरिष्ठ कार्यालयात पाठविण्याचे आश्‍वासन दिले.