पिंपरी – केंद्र सरकारने केलेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमधील वाढ ही सामान्य नागरिकांसाठी अतिशय जाचक आहे. भाटनगर परिसरात वाढते दुर्गंधीचे साम्राज्य आणि रहाटणी काळेवाडी परिसरात होत असलेला अनियमित पाणीपुरवठा याविरोधात शिवव्यापारी सेनेच्या वतीने मोरवाडी चौक येथे प्रशासनाविरोधात निदर्शने देण्यात आली. पेट्रोल, डिझेल दरवाढ, वाढती दुर्गंधी आणि अनियमित पाणीपुरवठा याबाबत शिवव्यापारी सेनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवव्यापारी सेनेचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष युवराज दाखले, पदाधिकारी व महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील काही महिन्यांपासून शासन सामान्य जनतेला केवळ आश्वासने देत आहे. पेट्रोल आणि डिझेलवर विविध प्रकारचे कर लावून त्यांच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत आहे. पेट्रोल दरवाढीचा आलेख दररोज वाढत आहे. राहटणी काळेवाडी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत करण्यात आला आहे.