शिवशक्ती पतसंस्थेत कोट्यवधींचा अपहार

0

पुणे : बाणेर परिसरातील शिवशक्ती को- ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीमध्ये कोट्यवधींचा अपहार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याप्रकरणी संचालक मंडळावर असलेल्या पिंपरी चिंचवडच्या आजी-माजी नगरसेवकांसह एकूण दहा जणांवर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभारी महाव्यवस्थापक बाळकृष्ण यशवंत पोळ, कार्यकारी संचालक नौशाद महम्मद पिरजादे, अध्यक्ष संजय पांडुरंग कलाटे, संस्थेचे संचालक राजेंद्र किसन नेटके, शरद परशुराम बोर्हाडे, दिलीप गेनभाऊ कलाटे, मच्छिंद्र बबन जांभूळकर, रोहिदास बापूसाहेब मुरकुटे, दत्तात्रय बाबूराव साने, व एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी संजय पाटील (45, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय पाटील हे सहकारी संस्थांचे विशेष लेखा परिक्षक (वर्ग -1) आहेत. पाटील यांनी तक्रारीवरुन शिवशक्ती को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड मुंबई या पतसंस्थेचे सन 2015-16 चे वैधानिक लेखा परिक्षण केले. दरम्यान पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाकडे 24 नोव्हेंबर 2016 रोजी पडताळलेल्या कॅश बॅकनुसार 6 कोटी 64 लाख 20 हजार 392 रुपये इतकी शिल्लक असणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात 24 हजार 295 इतकीच रोख शिल्लक दाखवली. तसेच उर्वरित 6 कोटी 63 लाख 96 हजार रुपये इतकी रक्कम तपासणीकरता सादर केली. त्यामुळे पतसंस्थेत 6 कोटी 63 लाख 96 हजार रुपयांचा अपहार झाला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संजय पाटील यांनी पतसंस्थेच्या संचालक, अधिकारी, व पदाधिकार्‍याविरोधात रकमेचा अपहार केला. तसेच ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डी. एस. शिंदे करत आहेत.