शिवशाहीचा प्रवास धोकादायक

0

चालक अप्रशिक्षित : जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास

बारामती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाही या खासगी एजंटच्या बसगाड्या भाड्याने घेतलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. या बसवरील चालक हे खासगी मालकांचे आहेत. तर वाहक हे एसटी महामंडळाचे आहेत. चालक हे पूर्णत: अप्रशिक्षीत असून या चालकावर नेमके नियंत्रण कोणाचे असा प्रश्‍न प्रवाशांना पडला आहे.
बारामती-पुणे या 98 किमीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वळणे आहेत. या वळणावर शिवशाही बस एकाबाजुला झुकतात. त्यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊनच प्रवास करतात. राज्य परिवहन महामंडळाने या मार्गावर एशियाड बस सुरू करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

अपघाताची शक्यता

स्वारगेट आणि बारामती येथील आगाऊ आरक्षण कार्यालयात याबाबत प्रवाशांचे व वाहकाचे सातत्याने वाद होताना दिसत आहेत. या बस खासगी मालकीच्या आहेत. असे समजल्यानंतर प्रवाशांनी या बसेसमधून प्रवास करण्याचे टाळल्याचे दिसून येत आहे. तरीही अट्टाहासापायी शिवशाही बसेस बारामती-पुणे मार्गावर ज्यादा प्रमाणात का सोडण्यात येत आहेत. तसेच या मार्गावर मोरगाव ते बारामती दरम्यान असणार्‍या वळणामुळे एखादा मोठा प्राणांतिक अपघात होण्याची वाट महामंडळ पाहत आहे की काय, असा प्रश्‍नही प्रवासी विचारू लागले आहेत.

प्रवाशांची लूट

काही शिवशाही बसेसचा चालक हा उंचीने कमी तसेच अशक्त आहे. त्याचप्रमाणे सदरची बस त्याच्या आवाक्यात राहील की नाही अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती असते. या बसच्या खासगी मालकांनी अप्रशिक्षित असे खासगी वाहनांचे चालक या बसेसवर नेमलेले आहेत. त्याचमुळे धोका जास्त प्रमाणात संभावतो आहे, असेही प्रवाशांनी बोलताना सांगितले. एसटी महामंडळ शिवशाहीच्या माध्यमातून प्रवाशांची लूट करीत असल्याचे दिसून आले आहे. मोठ्या प्रमाणात भाडे आकारणी करून सुविधांचा अभाव असलेल्या शिवशाही बस प्रवाशांच्या माथी मारली जात आहे. तसेच आत्तापर्यंत राज्यात 47 अपघात शिवशाही बसचे झाले आहेत. त्यामुळे शिवशाही बसने प्रवास करणे धोक्याचे असल्याचे मतही प्रवाशांनी व्यक्त केले.