अधिकमासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह
सांगवी : पिंपळे गुरव येथे कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्यावतीने अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहाच्या पाचव्या दिवशी प्रतिष्ठानचे विश्वस्त व सामाजिक कार्यकर्ते विजय जगताप यांच्या एकसष्ठी निमित्त संतपुजन करण्यात आले. यावेळी राजेंद्र जगताप मित्र परिवाराच्यावतीने जगताप यांना समाजभूषण पुरस्कार गौरविण्यात आले. हा पुरस्कार शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे, वारकरी शिक्षण संस्थेचे गुरूवर्य मारूती कुर्हेकर, डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांच्या प्रदान करण्यात आला. तसेच एकसष्ठ लोकांना संत तुकाराम गाथा, शाल, श्रीफळ देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी माजी महापौर शकुंतला धराडे, मावळचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, नगरसेविका माई काटे, स्वामी शिवानंदमहाराज उपस्थित होते.
अधिक महिन्याच्या निमित्ताने सुरू असलेल्या सप्ताहात दररोज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी दोन वेळ महिला मंडळाचे भजन, संध्याकाळी कीर्तन आणि रात्री जागर अस नित्यक्रम सुरू आहे. सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील असंख्य भाविक दररोज कीर्तनाचा आस्वाद घेत असून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे यांनीही येथे भेट देऊन कीर्तनाचा आस्वाद घेतला.
खासदार बारणे यांचा विशेष सत्कार
वयाच्या 95 वर्षीही शरीराने थकलेले शिवशाहिर बाबासाहेबांनी यावेळी ‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा… ’ हा अभंगाच्या ओळी म्हणून या विजय जगतापांना शुभेच्छा दिल्या. गुरूवर्य कुर्हेकर व डॉ. लहवितकर यांनी जगताप यांच्या कुटुंबियांचे धार्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करून संतमहात्म्य सांगितले. दरम्यान याच वेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनाही प्रतिष्ठानच्यावतीने माजी नगरसेवक जगताप, शाम जगताप यांच्या हस्ते गौरविण्यात आले. संजय जगताप, निलेश जगताप व शैलेश जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.