शिवशाहीला उरणचे वावडेच!

0

उरण । बेसुमार औद्योगिकीकरणामुळे पैसेवाला तालुका म्हणून ओळख असलेल्या उरण तालुक्याबाबत एसटीच्या शिवशाहीला मात्र वावडेच असल्याचे समोर आले आहे. उरण येथून निदान लांब पल्ल्याची असलेल्या शिर्डीसाठी तरी वातानुकूलित शिवशाही किंवा शिवनेरी बस सुरू करावी, या मागणीला मात्र एसटी महामंडळाकडून वाटाण्याच्या अक्षताच लावल्या जात आहेत. विशेष म्हणजे काही सामाजिक संघटनांनी अशी मागणी उरणच्या एसटी आगाराकडे केल्यानंतर एसटी आगाराने नागरिकांच्या मागणीनुसार एसटीच्या विभागीय वाहतूक अधिकारी यांच्याकडे तशी मागणी केली. मात्र, आजतागायत उरणकरांना हवी असलेली गारगार बस मात्र मिळू शकलेली नसल्याची सनसनाटी माहिती हाती आली आहे. यासंदर्भात एसटीच्या उरण आगाराने केवळ मागणी पत्रच नव्हे, तर विभागीय वाहतूक अधिकारी कार्यालयाला स्मरणपत्रही पाठवले असल्याची माहिती एसटीच्या उरण आगाराचे वरिष्ठ लिपिक संजय पाटील यांनी बोलताना दिली आहे. यासंदर्भात एसटीच्या विभागीय वाहतूक विभागाशी संपर्क साधला असता उरणला शिवशाही देण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून बस उपलब्ध झाल्यास नक्की देता येईल, अशी माहिती सहाय्यक वाहतूक अधिकारी श्रीमती ए. पी. मानमोडे यांनी बोलताना दिली आहे. या सर्व प्रकारामुळे एसटीच्या शिवशाही किंवा शिवनेरीतून उरणकरांचा गारगार प्रवास मात्र अजून तरी दूरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रायगड जिल्ह्याचा विचार करता एसटीच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडे जिल्ह्यातील उरण आणि पनवेल आगाराला ढकलले आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या तालुक्यातूनही एसटीच्या शिवशाही या आरामदायी वातानुकूलित गाड्या विविध ठिकाणांवर सुरू झालेल्या असतानाच मुंबईशी जोडल्या गेलेल्या उरण एसटी आगारातून मात्र अशाप्रकारची गारेगार बस कोणत्याच मार्गावर सुरू झालेली नाही. विशेष म्हणजे उरण येथून दररोज शिर्डी या साईबाबांच्या देवस्थान ठिकाणी साधी बस सकाळी नऊ वाजता सोडण्यात येते.

या बसला नागरिकांचा प्रतिसाद ही अतिशय चांगला आहे. त्यातच उरण तालुक्याचा विचार करता संपूर्ण तालुकाच औद्योगिकीकरणाने बहरलेला आहे. त्यातच सिडको आणि खासगी विकासकांकडून सुरू असलेल्या विकासाच्या निमित्ताने तालुक्याचा आर्थिक विकास ही बर्‍यापैकी सुधारला आहे. या पार्श्‍वभूमीवर धूळ, वारा, ऊन, पाऊस आदीचा त्रास सहन करीत शिर्डीला जाण्यापेक्षा सुमारे सातशे रुपये तिकीट खर्च करून वाशी येथून खासगी व्होल्वो बसने शिर्डीला जाणे आणि पुन्हा येणे असा प्रवास मोठ्या प्रमाणात पसंद केला जातो. त्या मानाने साध्या एसटीचे शिर्डीसाठी असलेले 390 रुपायांचे तिकीट दर शिवशाही सारख्या बस साठी अवघे दीडशे रुपये वाढून 550 रुपये होणार असल्याने उरणकर शिवशाहीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील, अशी शक्यता असतानाही एसटी मंडळाच्या लालफितीत उरणकरांचा शिर्डीचा गारेगार प्रवास अडकला असल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे.