‘शिवशाही’साठी करावी लागेल प्रतीक्षा

0

नाशिक । राज्य परिवहन महामंडळाने मोठा गाजावाजा केलेल्या स्लीपर कोच शिवशाही बससाठी नाशिककरांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे व कोल्हापूर येथून शिवशाही बसगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. नाशिक विभागाला एकही शिवशाही बस मिळालेली नाही.

‘एसटी प्रवास- सुखाचा प्रवास’
‘एसटी प्रवास- सुखाचा प्रवास’ असे ब्रीदवाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून प्रवाशांना दर्जे दार व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच खासगी लक्झरी बसगाड्यांच्या आव्हानाला टक्कर देता यावी, तसेच प्रवाशांना रात्री वातानुकूलित गाडीत झोपून प्रवास करता यावा म्हणून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन विभागातर्फे शिवशाही बसगाडी सुरू करण्याची घोषणा केली.

नाशिक-पुणे मार्गाचा अजून अभ्यासच, प्रवासभाडे आवाक्याबाहेरचे
सध्या नाशिक-पुणे महामार्गावर परिवहन महामंडळाची वातानुकूलित शिवनेरी बसगाडी दररोज धावत आहे. याचे प्रवासभाडे सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर आहे. जर शिवशाही बसगाडी नाशिक-पुणे आणि इतर मार्गांवर सुरू केली तर तिला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळेल, प्रवासभाडे कितपत परवडण्यासारखे असेल, याचा विचार केला जात आहे. त्यामुळे शिवशाही बसगाडी दाखल झाली तरीही तिला मिळणार्‍या प्रवाशांच्या प्रतिसादावरच सर्वकाही अवलंबून असेल.