पुणे । राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवशाही या नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित बसमध्ये इंटरनेट वायफाय बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्व शिवशाहींमध्ये एप्रिलपर्यंत टप्प्याटप्प्याने वायफाय बसविण्यात येणार आहे. मोफत इंटरनेट सेवा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांना सोशल मीडियाचा वापर करता येणार आहे. मनोरंजनासह अन्य संकेतस्थळांनाही भेट देता येणार असून यामुळे प्रवाशांचा कंटाळवाणा प्रवास सुखकर होण्यास आता मदत होणार आहे.
शिवशाहीमधील चालकाच्या पाठीमागे एक कंपार्टमेन्ट (निराळा भाग) तयार करण्यात येणार असून त्यामध्ये राउटर, दोन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सीटच्या पुढील बाजूस वायफाय कसा वापरावा याची माहिती दिली जाणार असून त्यावर वायफायचा पासवर्ड लिहिण्यात येईल. कॉमन वायफाय या प्रकारात शिवशाहीमधील वायफाय मोडत असून एसटीने दिलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांबरोबरच वॉट्सअप, फेसबुक देखील बघता येणार आहे. शिवशाहीमध्ये वायफाय सुविधा सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा या सेवेस उत्स्फूर्त पाठिंबा मिळण्याचा अंदाज एसटीने वर्तविला आहे. यामुळे येत्या काळात शिवशाही बसेस तुडुंब भरतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
200 बसमध्ये इंटरनेट
पुढील दोन महिन्यांमध्ये 200 शिवशाहींमध्ये वायफाय बसविण्यात येणार असून एप्रिल अखेरपर्यंत दाखल होणार्या तब्बल दोन हजार शिवशाहींमध्ये वायफाय बसविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. ज्या कंपनीकडून शिवशाहीच्या बस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत, त्या कंपनीकडूनच वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वायफायच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी त्या कंपनीवरच राहील, असेही सांगण्यात आले.