आग्रा ते राजगड अशी १४५० किलोमीटरची आव्हानात्मक पायी अभ्यास मोहीम
नारायणगाव । शिवसामर्थ्य जगाला कळण्याची गरज आहे. स्वराज्याची तळमळ छत्रपतींना असल्याने त्यांनी आग्य्राहून सुटका करून घेतली. त्यावेळी मोठ्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. पूर्वजांचा हा त्याग आजच्या पिढीला कळावा, म्हणून आग्रा (उत्तरप्रदेश) ते राजगड (पुणे) अशी १४५० किलोमीटरची आव्हानात्मक पायी अभ्यास मोहीम सुरू केली असल्याची माहिती आग्रा ते रायगड पायी भ्रमण मोहिमेचे प्रमुख दुर्ग शिवप्रेमी सरदार पिलाजी गोळे यांचे १४ वे वंशज अॅड. मारुती गोळे यांनी नारायणगाव येथे दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांची जगप्रसिद्ध असलेली १७ ऑगस्ट १६६६ ची आग्य्राहून सुटका या घटनेला ३५१ वे वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सरदार पिलाजी गोळे प्रतिष्ठानचे सदस्य दुर्गप्रेमी अॅड. मारुती गोळे, अनिल ठेंबेकर आणि मनोज शेळके या पुण्यातील तीन जणांनी आग्रा ते राजगड अशी पायी अभ्यास मोहीम सुरू केली आहे. १७ ऑगस्ट पासून आग्राहून या मोहिमेला सुरुवात झाली.
आग्य्रात राजगडावरील मातीचे पूजन
आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजर कैदेत होते त्या सध्याच्या जयसिंग हाऊस येथे राजगडावरील मातीचे पूजन करून तेथील माती राजगडावरील पद्मावती मंदिरात घेऊन निघणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. शिवाजी महाराज ज्या मार्गाने आले त्याच मार्गाने प्रयाण करून राजगडपर्यंत पायी चालत मोहीम पूर्ण केली.
मोहिमेचे नारायणगावात स्वागत
या मोहिमेचे स्वागत शुक्रवारी नारायणगाव येथे करण्यात आले. गावातील पूर्व वेशीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन करून गोळे यांचे स्वागत नारायणगाव तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बाबू पाटे, ग्रामपंचायत सदस्य आशिष माळवदकर, संतोष दांगट, संजय गुंजाळ, विजय सणस, श्रीहरी मारणे, अजित वाजगे, अनिल खैरे, जयेश कोकणे, सचिन खैरे, मंदार पाटे, निलेश जेजुरकर, शंकर जाधव, संग्राम घोडेकर आदींनी केले.
विविध गड किल्ल्यांची भ्रमंती
गोळे यांनी आजपर्यंत विविध गड, किल्ले यांची भ्रमंती करून विक्रम केले आहेत. २०१२ पासून राज्य, परराज्यातील ५१३ किल्ल्यावर भटकंती, सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा-रायगड असे ५ गड एकाच दिवशी १६ तास ५५ मिनिटे या वेळेत पदभ्रमण, ३४ मिनिटांत सिंहगड सर करून सिंहगडावर २२९ वेळा गेले आहेत. अनेक आडवाटेवरच्या अपरिचीत-गुहा मंदिरांची भटकंती त्यांनी केली आहे. सिंधदुर्ग मधील मनसंतोष गडावर पहिला दुर्ग अभ्यासक म्हणून ते पोहचले आहेत. मनमाडमधील गोरखगडचा माथा, कर्जत जवळील मच्छिंद्रगड, गडचिरोलीतील टीपागड, दुर्ग अभ्यासक, भटकंती करणारे, शिवप्रेमी, यांच्यापासून दूर असलेल्या या गडावर गोळे पोहचले आहेत.