पुणे । कोथरूड येथे प्रस्तावित शिवसृष्टीबाबतचा महापौर मुक्त टिळक यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. असे असताना मुख्यमंत्री 5 वेळा पुण्यात येऊन देखील कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे येत्या महिन्याभरात शिवसृष्टीबाबतचा निर्णय न झाल्यास मेट्रोचे काम बंद पडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी मुख्यसभेत दिला. याला शिवसेना आणि मनसेने पाठिंबा दर्शवला. मंगळवारी शिवसृष्टीबाबतच्या खास सभेचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसृष्टीच्या जागेवर मेट्रो स्टेशनचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे ‘मेट्रो का शिवसृष्टी अथवा दोन्ही?’ हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीच तेथे मेट्रो स्टेशन होणार हे निश्चित झाले आहे. असे असताना शिवसृष्टीही तेथे झाली पाहिजे असा आग्रह काही नगरसेवकांनी धरला होता. परंतु त्यावर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. मेट्रो स्टेशन व्यतिरिक्त या ठिकाणी शिवसृष्टीही होऊ शकते, असा अहवाल महामेट्रोने दिला होता. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी खास सभेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्व पक्षीय सदस्यानी शिवसृष्टी होण्याच्या बाजूने मत व्यक्त केले होते.
महिनाभरात निर्णयाचे आश्वासन
पालकमंत्री गिरीश बापट यांनी याची दखल घेत मुंबईत मेट्रोचे अधिकारी व महापालिका पदाधिकारी यांची खास बैठक घडवून आणली. या बैठकीत मेट्रोसाठीच्या 28 एकर जागेवर काही भागात स्थानक तसेच काही भागात शिवसृष्टी असे करणे शक्य आहे, याची तंत्रज्ञांमार्फत चाचपणी करण्याचे ठरले आहे. तसेच मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी, काही तंत्रज्ञ व महापालिका पदाधिकारी अशी संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्याचा निर्णयही त्यावेळी झाला.मात्र दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौर्यावर असल्याने अशी बैठक झालीच नाही. त्यामुळे महापौर टिळक यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर बोलून येत्या महिनाभरात यासंबधीचा निर्णय घेतला जाईल सांगितले.
येत्या महिनाभरात प्रश्न मार्गी लावण्याचा इशारा
मात्र अशी कोणतीही बैठक झाली नाही त्यामुळे मानकर यांनी मेट्रोचे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे मानकर म्हणाले, महापौर मुक्ता टिळक यांनी मागील महिन्यात शिवसृष्टीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्गी लावणार असल्याचे सांगितले होते. मात्र तेव्हापासून मुख्यमंत्री पाच वेळेस पुणे शहरात आले तरीही कोणताच ठोस निर्णय होताना दिसत नाही त्यामुळे येत्या महिनाभरात जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर मेट्रोच काम बंद पाडणार असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या आधी भाजपने सिंहगडावर शपथ घेतली. मात्र, निवडून आल्यापासून शिवसृष्टी विषयी कोणतीच हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे यापुढे थेट रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी दिला आहे.
प्रश्न मार्गी का लावला नाही?
तर आज आमच्यावर टीका करणारेच मागील काळात सत्तेवर होते. त्यावेळी शिवसृष्टीचा विषय का मार्गी लावला गेला नाही. मात्र आम्ही छत्रपतींच्या मार्गाने काम करत असून लवकरच कोथरूडमध्येच हे काम केले जाणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांनी यावेळी सांगितले.