‘शिवसृष्टी’चा मुद्दा पेटला!

0

दहा दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मेट्रोचे काम बंद पाडू : मानकर

पुणे : कोथरूड येथील नियोजित शिवसृष्टीबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आयोजित करणाचे सत्ताधारी भाजपने दिलेले आश्वासन पाळले नाही. मुख्यमंत्री पाचवेळा पुण्यात येऊनदेखील शिवसृष्टीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसांत शिवसृष्टीबाबत निर्णय झाला नाही, तर पौड रस्त्यावरील मेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा माजी उपमहापौर आणि नगरसेवक दीपक मानकर यांनी दिला आहे.

अन् मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झालीच नाही!
कोथरूडच्या जागेवर मेट्रो स्टेशनव्यतिरिक्त या ठिकाणी शिवसृष्टीही होऊ शकते, असा अहवाल महामेट्रोने दिला होता. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी खास सभेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्व राजकीय पक्षांनी शिवसृष्टी करण्यास सहमती दर्शविली होती. पालकमंत्री गिरीश बापट यांनी याची दखल घेत मुंबईत मेट्रोचे अधिकारी व महापालिका पदाधिकारी यांची खास बैठक घेतली होती. या बैठकीत मेट्रोसाठीच्या 28 एकर जागेवर काही भागात स्थानक आणि काही भागात शिवसृष्टी असे करणे शक्य आहे, याची तंत्रज्ञांमार्फत चाचपणी करण्याचे ठरले होते. त्यासाठी संयुक्त बैठक घेण्याचे ठरले होते. त्या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौर्‍यावर असल्याने शिवसृष्टीबाबत बैठक झालीच नाही. त्यामुळे महापौर टिळक यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर बोलून महिनाभरात यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबतची कोणतीही बैठक झाली नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसांत हा प्रश्न मार्गी लागला नाही, तर पौड रस्त्यावरील मेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा मानकर यांनी दिला.