शिवसृष्टीचे काम तातडीने मार्गी लावावे

0

पुणे । कोथरूड परिसरात मेट्रोचा डेपो तसेच शिवसृष्टी उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी त्वरित चर्चा करण्याचे आश्‍वासन पालकमंत्री व महापौर यांनी दिले होते. मात्र, दीड महिना उलटल्यानंतरही मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी कोणतीही हालचाल न करता केवळ आश्‍वासने देण्यापलीकडे काहीच करत नसल्याची टीका करत, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची तातडीने भेट घ्यावी, अशी विनंती करणारे स्मरणपत्र राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांनी महापौरांसह पालकमंत्र्यांना
पाठविले आहे.

शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणार्‍या मेट्रो प्रकल्पाचा डेपो प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे या जागेवर नक्की काय करायचे यावर गेल्या अनेक वर्षांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. पालिकेने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात (डीपी) या प्रकल्पासाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. या जागेवर दोन्ही प्रकल्प करणे शक्य असल्याचा अहवाल देण्यात आल्याने या परिसरात असलेली बीडीपीची तसेच वनविभागाची जागा ताब्यात घेऊन तेथे हे प्रकल्प राबविणे शक्य असल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाली होती.

सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी
कोथरूड येथील नियोजित शिवसृष्टी प्रकल्पाची गेले आठ ते दहा वर्षांपासून चर्चा सुरू आहे. या ठिकाणी शिवसृष्टीचा प्रकल्प करण्यास सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरीही देण्यात आली. दीड महिन्यांपूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठकदेखील झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांची वेळ घेऊन चर्चा करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप आश्‍वासनापलीकडे काहीच होत नसल्याने मानकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.