शिवसृष्टीच्या खास सभेला मेट्रोच्या अधिकार्‍यांना बोलवा

0

पुणे । कोथरूड शिवसृष्टी प्रकल्प पाठपुरवठा करून देखील प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याने या प्रकल्पाबाबत 28 जुलैला खास सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. या खास सभेमध्ये मेट्रोच्या अधिकार्‍यांनाही बोलावण्यात यावे, असे पत्र महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी महापौर टिळक यांना दिले आहे.

कोथरूडमधील कचरा डेपोच्या 28 एकर पाच गुंठे जागेत शिवसृष्टी उभारण्यास मुख्यसभेने मंजुरी दिली आहे. मात्र, राज्य शासनाकडून अद्याप त्यास परवानगी मिळालेली नाही. त्यातच या जागेवर मेट्रोचे टर्मिनस ही प्रस्तावित आहे. शिवसृष्टी प्रकल्प हा पालिकेच्या अन्य प्रकल्पासारखा नाही. या मागे देश-विदेशातील लाखो नागरिकांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती असलेली भक्ती आणि प्रेम आहे. या शिवसृष्टीत अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती असणार आहेत. त्यासाठी या जागेची गरज आहे.

मेट्रोचे भुयारी स्थानक
शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे मेट्रोची निंतात गरज आहे. त्यामुळे मेट्रोचे भुयारी स्थानक करून तिथे शिवसृष्टी उभारावी, अशी मागणी यापूर्वी महापौरांकडे केली असून त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे खास सभेची मागणी करण्यात आली आहे. 28 जुलै रोजी दुपारी 3.00 वाजता पर्यावरण सभा आणि त्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे.

पालिका करणार भूमिका स्पष्ट
दरम्यान, शिवसृष्टी आणि मेट्रोचे स्थानक एकाच ठिकाणी होऊ शकते, असे महामेट्रोनेही स्पष्ट केले आहे. मात्र, त्यानंतरही वारंवार संभ्रम निर्माण होत असल्याने महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट करावी, या उद्देशाने ही खास सभा बोलविण्यात आली आहे. त्यामध्ये मेट्रोच्या अधिकार्‍यांना बोलावण्यात आले नाही. नियोजित प्रकल्पाच्या जागेवर मेट्रोचाही प्रकल्प असल्याने त्यांनाही बोलावण्यात यावे, असे भोसले यांचे म्हणणे आहे.