पुणे । कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारायची की मेट्रो स्टेशन याबाबत अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. मात्र, शिवसृष्टीसाठी नागरिकांच्या भावनांचा आदर राखत महापालिका घेईल. त्या निर्णयानुसार, महामेट्रो आपले काम करेल, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली. मेट्रो डेपोसाठी सुमारे 11 हेक्टर जागेची आवश्यकता असून या डेपोच्या ठिकाणी मेट्रो आणि शिवसृष्टी करण्याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याची घोषणा केली जाणार असल्याचे दीक्षित यांनी यावेळी स्पष्ट केले.
कचरा डेपोच्या जागेचा वाद
मेट्रो प्रकल्पाच्या मान्यतेआधीच महापालिकेच्या मुख्यसभेने कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी प्रस्तावित केली होती. मात्र, त्यानंतर मेट्रोचा डीपीआर करणार्या दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमीटेडने ही जागा डेपोसाठीच वापरता येणार असल्याचा निर्वाळा केला होता. त्यानंतर या जागेवर काय होणार यावरून वाद सुरू आहेत. तर महापालिकेने या पूर्वीच शिवसृष्टीस मान्यता दिलेली असल्याने त्या जागेवर मध्यमार्ग म्हणून मेट्रोचे स्टेशन भूमिगत करावे व वरील बाजूस शिवसृष्टी करावी अशी मागणी माजी उपमहापौर दिपक मानकर यांनी केली आहे. त्यासाठी खास सभा घेण्याची मागणीही त्यांनी महापौरांकडे केली. मात्र, त्यासाठी घेण्यात आलेल्या सभेत कोणताही तोडगा निघालेला नाही.
मेट्रोत पालिकेची भागिदारी
याबाबत दीक्षीत यांना विचारले असता, अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. शिवसृष्टी आणि मेट्रो या जागी करणे शक्य आहे. मात्र, ते कशाप्रकारे असावे याबाबत तोडगा काढण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मेट्रो प्रकल्पात महापालिकेचीही भागिदारी असल्याने तसेच शहरासाठी हा प्रकल्प असल्याने महापालिकेने घेतलेला निर्णय महामेट्रोस मान्य असेल, असे सांगत या वादाचा चेंडू दीक्षित यांनी पालिकेच्या कोर्टात टोलविला आहे.