शिवसृष्टी बीडीपीच्या जागेवर?

0

कोथरुड । शिवसृष्टी कचरा डेपो येथील मेट्रो स्थानकाच्या जागेवर न करता त्यापुढेच असणार्‍या बीडीपीच्या (जैवविविध उद्यान-टेकडी) जागेवर करण्याबाबत मेट्रोने प्रस्ताव ठेवल्याचे समजते. त्यासाठी वनाझपर्यंतचा मेट्रो मार्ग पुढे चांदणी चौकापर्यंत नेण्याची तयारी आहे. महामेट्रो कंपनीतील वरिष्ठ सूत्रांनी याची माहिती दिली. वनाझ येथील कचरा डेपो महापालिकेने बंद केल्यानंतर या 28 एकर जागेवर शिवसृष्टी प्रकल्प पालिकेने प्रस्तावित केला होता. तत्कालीन उपमहापौर दीपक मानकर यांनी त्याचा पाठपुरावा करून विषय मंजूर केला. ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची त्यासाठी नियुक्ती करून घेतली. मात्र, त्यानंतर मेट्रोची चर्चा सुरू झाली.

शिवसृष्टीसाठी बीडीपीची जागा योग्य
सुमारे 65 ते 70 एकर जागेवर ही टेकडी आहे. ती जैवविविध उद्यान म्हणून आरक्षित आहे. या टेकडीवर शिवसृष्टी केल्यास ती अधिक चांगली होऊ शकते, असे मेट्रोच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. मेट्रो या टेकडीपर्यंत नेण्याचीही यासाठी त्यांची तयारी आहे. साधारण 2 किलोमीटर इतके हे अंतर आहे. भुसारी कॉलनी व चांदणी चौक अशी दोन स्थानके यात येतील. एका किलोमीटरचा मेट्रोचा खर्च साधारण 125 कोटी रुपये आहे. त्याचा प्रकल्प आराखडा तयार करून हा मार्ग सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामाबरोबरच करण्याचीही महामेट्रोची तयारी आहे. तसा लेखी प्रस्तावच त्यांनी दिला असल्याची माहिती मिळाली.

आंदोलनाचा इशारा
वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गासाठीही शिवसृष्टीचीच जागा प्रस्तावित करण्यात आली. हीच जागा हवी, अशी मानकर व अन्य शिवप्रेमींची अपेक्षा आहे. या संदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घेऊन मुंबईत बैठक आयोजित केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होणार होती. त्याला तब्बल चार महिने झाले तरीही ही बैठक अद्याप झालेलीच नाही. मानकर यांनी त्यासाठी आंदोलनाचाही इशारा दिला आहे. दरम्यान, काही घडामोडींमध्ये आता महामेट्रो कंपनीने शिवसृष्टी सध्याच्या जागेच्या पुढे काही अंतरावर असणार्‍या बीडीपीच्या जागेवर न्यावी, असा प्रस्ताव दिला असल्याची माहिती मिळाली.

17 जानेवारीला विशेष सभा
नितीन देसाई यांनीही टेकडीसारखे क्षेत्रफळ मिळाले तर तिथे अधिक चांगल्या प्रकारे शिवसृष्टी उभी करता येईल, असे मत खासगीत व्यक्त केले असल्याचे महामेट्रोमधील सूत्रांनी सांगितले. यामुळेच शिवसृष्टीचा विषय रेंगाळत न ठेवता त्यावर त्वरित निर्णय व्हावा, असे त्यांचे म्हणणे आहे. 11 हजार कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पामध्ये अधिक 200 कोटी रुपये झाले, तर त्यामुळे काही फरक पडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, या विषयावर महापालिकेने 17 जानेवारीला खास सभेचे आयोजन केले आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक व्हावी, अशी मागणी दीपक मानकर यांनी केली़

सरकार किती शिवप्रेमी आहे तेच आम्हाला पाहायचे आहे. बीडीपीच्या जागेच्या प्रस्तावाचे माहिती नाही. मुळात ही जागा ताब्यात आहे का? त्यावर नियमाप्रमाणे असे बांधकाम करता येते का? मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक व्हावी, ही आमची मागणी सातत्याने टाळली जात आहे. शिवसृष्टीबाबत कोणतीही तडजोड पुणेकर शिवप्रेमी सहन करणार नाहीत.
– दीपक मानकर
नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस