शिवसृष्टी बीडीपीच्या जागेवरच!

0

पुणे । कोथरूडमध्ये बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी आणि कचरा डेपोच्या जागी मेट्रो स्टेशन उभारण्यास महापालिकेच्या मुख्यसभेत शुक्रवारी एकमताने मंजुरी देण्यात आली.महापालिकेच्या सभेत याविषयावर चार तासाहून अधिक वेळ भाषणे झाली. कोथरूड स. क्र. 99 आणि 100 येथे शिवसृष्टी उभी केली जाणार आहे. बीडीपी (जैववैविध्य उद्यान) च्या जागेत शिवसृष्टी उभारण्यात कायदेशीर अडचणी येतात का? याचा खुलासा राज्य सरकाने करावा असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अन्य विरोधी पक्षांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर मुक्ता टिळक होत्या. या चर्चेत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, सुभाष जगताप, अरविंद शिंदे यांची भाषणे झाली. आंबेगाव येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवसृष्टी प्रकल्प उभा केला आहे. राज्य सरकारने त्याला मंजुरी दिल्याचे सभेत समजल्यावर चर्चा अधिक वाढली. राज्य शासनाच्या या निर्णयाचे पडसाद बैठकीत उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील नेत्यांची बैठक घेऊन शिवसृष्टी आणि मेट्रो स्टेशन या वादात तोडगा काढला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अभिनंदनाचे फलक लावले. महापालिकेतील भाजपने पुढाकार घेऊन शुक्रवारी विशेष सभा घेऊन विषय मंजूर केला.

सभेला गोगावले यांची हजेरी
कोथरूड येथील शिवसृष्टीच्या विषयावर पुणे महापालिकेत शुक्रवारी खास सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले हे ही हजर होते. या सभेत भाजप नगरसेवकांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे त्यांनी लिहून घेतले. यापुर्वी पर्यावरण अहवाल या विषयावर झालेल्या सभेतही गोगावलेंनी हजेरी लावून सभागृहातील आपल्या नगरसेवकांवर ’वॉच’ ठेवला होता. आज सभागृहात फेटे बांधून हजर असलेले आणि कधी न बोलणारे भाजपचे नगरसेवकही आपले मुद्दे मांडताना दिसून आले.