सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळल्याने गेले शरण
जळगाव : मालेगाव तहसील आवारातून लावलेली वाळूची वाहने पळवून नेण्यासह अवैध वाळू वाहतुकीप्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसेनेचे निलेश पाटील (रा.जळगाव) व रमेश कटारे (रा.नाशिक) यांना मालेगाव छावणी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व नामंजूर केल्याने निलेश पाटील मंगळवारी मालेगाव छावणी पोलिसांना शरण गेले. न्यायालयात हजर केले असता दोघांना 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनाववण्यात आली आहे.
मालेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2018 मध्ये महसूलच्या पथकाने वाळू वाहतूक करणारे दहा ते बारा वाहने पकडली होती. या चालकांकडे पावत्या मागितल्या असता त्या बनावट आढळून आल्या होत्या. त्यानंतर हे वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली होती. तेथून देखील ही वाहन पळवून नेण्यात आली होती. याप्रकरणी महसूल विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन छावणी पोलीस स्टेशनला 12 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी 10 जणांना यापूर्वीच अटक झालेली आहे.
बनावट पावत्यांव्दारे वाळूची वाहतूक
निलेश पाटील व रमेश कटारे या गुन्ह्यात फरार होते. दोघांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे दोघंजण सोमवारी छावणी पोलिसांकडे शरण आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी दिली. निलेश पाटील व इतरांनी अमळनेर तालुक्यात वाळूचा ठेका घेतला होता. तेथून नाशिक जिल्ह्यात वाळूची वाहतूक केली जात होती. मात्र कारवाईच्यावेळी बनावट पावत्या आढळून आल्याने ही वाळू अवैध असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कारवाई करण्यात आली होती.