पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची माहिती : जिल्हा बैठकीत पक्ष बांधणीवर चर्चा
जळगाव– पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघाचा विकास करण्यासाठी शिवसेना आमदारांना दुसरा मतदारसंघ दत्तक घेण्याच्या सुचना आज झालेल्या जिल्हा बैठकीत देण्यात आल्या असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकार परीषदेत दिली. दरम्यान या बैठकीत पक्ष संघटना बांधणीवरही चर्चा करण्यात आली. यावेळी आ. किशोर पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ उपस्थित होते.
शिवसेनेची जिल्हा बैठक अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे होते. बैठकीनंतर आयोजीत पत्रकार परीषदेत माहिती देतांना ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, आजच्या जिल्हा बैठकीत जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपप्रमुख, आमदार, महिला आघाडीचे पदाधिकारी, युवासेनेच्या पदाधिकार्यांशी चर्चा करण्यात आली. आगामी काळात होणार्या नगरपालिका निवडणुकांसाठी पक्ष बांधणी मजबुत करण्याच्या दृष्टीने सुचना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
दत्तक विधानाने मतदारसंघाचा विकास
जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न प्रलंबीत आहेत? कुठल्या योजना रखडल्या आहेत? यांची माहिती घेण्यासाठी शिवसेना आमदारांना दुसरा मतदारसंघ दत्तक घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यामाध्यमातुन मतदारसंघांचा विकास साध्य केला जाणार असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकार्यांची बैठक बोलावली जाणार आहे. जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्प, बलुन बंधारे असे प्रलंबीत प्रकल्पांची नेमकी स्थीती जाणून घेऊन त्यांचे काम लवकरात लवकर पुर्ण व्हावे यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. कालवा दुरूस्तीसाठी 350 कोटी रूपये लागणार आहेत. राज्यात पाणी पुरवठा विभागातील 800 कोटी रूपयांचे कामांचे स्थगिती आदेश उठविण्यात आले असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले. नाशिक विभागाच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक नाशिक येथे दि. 24 रोजी होणार आहे. तत्पुर्वी जिल्ह्याच्या नियोजन समितीची बैठक होणे अनिवार्य असल्याने जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक दि. 20 रोजी आयोजीत करण्यात आली असल्याचे ना. पाटील यांनी शेवटी सांगितले.