शिवसेना उपनेते डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीत !

0

पिंपरी चिंचवड ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे गाजलेले अभिनेते आणि शिवसेना उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 2014 मध्ये कोल्हे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा घेत शिवसेनेने त्यांच्या हाती शिवबंधन बांधले होते. त्यांना उपनेतेपदही दिले होते. मात्र, कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पावर यांची भेट घेतली आणि तर्कवितर्कांना उधाण आले. कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरुर मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास तेथील शिवसेनेचे विद्यमान खासदार आढळराव पाटील यांना जोरदार टक्कर मिळू शकते.

विशेष म्हणजे कोल्हे यांच्यासोबत दोन माजी आमदारही राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधणार आहेत. मुंबईत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. अमोल कोल्हे यांच्यासह बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजपा सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला आहे. तसेच, यश मिलिंद पाटील, किशोर प्रकाश पाटील, डॉ. हर्षल यशवंत पवार, वरपे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.