शिवसेना एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभी राहणार का?

0

एस.टी. कर्मचा-यांच्या संपाबाबत धनंजय मुंडे यांचा सवाल

मुंबई:- राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या संपाबाबत बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारसह शिवसेनेवर देखील हल्ला चढविला आहे. सरकारवर सातत्याने टीका करणा-या शिवसेनेला त्यांच्या मंत्र्याकडे असलेल्या विभागाने केलेली ही दरवाढ मान्य आहे का ? असा सवाल मुंडे यांनी केला आहे. अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केलेल्या संपावेळी आम्हाला साथ देणारी शिवसेना आणि सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता ही एसटी कर्मचारी यांच्या बाजूने ठाम उभे राहतील का? असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

मुंडे म्हणाले की, एसटीच्या दरवाढीमुळे आधीच त्रस्त सामान्य जनतेचे कर्मचा-यांच्या संपामुळे हाल होत आहे. एकीकडे कर्मचा-यांना पगारवाढ दिल्याचे कारण दाखऊन तिकिटांची दरवाढ करायची , दुसरी कडे कर्मचारी यांना ही समाधानकारक पगारवाढ न देऊन त्यांचीही फसवणूक करायची असा सरकारचा दुहेर कारभार सुरू आहे, अशी टीका मुंडे यांनी केली आहे.

राज्यात सुरू असलेल्या एस. टी. कर्मचा-यांच्या संपाबाबत, कर्मचा-यांच्या न्याय मागण्यांबाबत सरकारने तातडीने तोडगा काढला पाहिजे. तसेच अन्यायकारक दरवाढ मागे घेऊन जनतेला आणि कर्मचारी यांना दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी ट्विट करून सरकारला केली आहे.