मुंबई: राज्यात महाविकास आघाडीने सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारने घेतलेले निर्णयाला स्थगिती द्यायला सुरुवात केली आहे. यावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडत आपल्या ट्वीटर वर एक व्हिडीओ टाकला आहे. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा किरीट सोमय्या, आणि शिवसेनेत वाक्युद्ध रंगणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या व्हिडिओत सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयामुळे शिवसेना कंत्राटदारांना काय संदेश देत आहे? असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती दिली. तसेच अन्य प्रकल्पांबाबतही फेरविचार करणार असल्याचं सांगितले. शिवसेनेने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. २ लाख कोटींच्या विकासकामांचे प्रकल्प स्थगित केले. रेल्वे, मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो, समृद्धी महामार्ग, अनेक रस्ते प्रकल्प सर्वांना स्थगिती दिली का? यातून कंत्राटदारांना काही सिग्नल द्यायचा आहे का? येऊन भेटावे असा आरोप त्यांनी शिवसेनेवर केला. राज्यातील प्रकल्प रखडले तर प्रकल्पांची किंमत वाढणार आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी शिवसेनेची आहे. भाजपा त्याचा निषेध करते अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली.
किरीट सोमय्या आणि शिवसेनेमधील वाद खूप जुने आहेत. मातोश्रीसह उद्धव ठाकरे, राहुल शेवाळेंवर सोमय्या यांनी अनेकदा आरोप केले आहेत. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि कंत्राटदारांकडून मातोश्रीला टक्केवारी दिली जाते असा थेट आरोप सोमय्या यांनी यापूर्वीही लावले आहेत.