शिवसेना-काँग्रेसची फिक्सिंग

0

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढत आहेत. त्यामुळेच आता या दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी गिरगावात झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरच निशाणा साधला होता. भाजपला सांगतो, तुम्ही तुमच्या संकटकाळी पाठीशी उभा राहणारा मित्र गमावलेला आहात. ‘ही फ्रेंडली मॅच नही है, ही आमच्या अस्मितेची लढाई आहे’, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यालाच रविवारी सकाळी लागलीच भाजपचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात फिक्सिंग झाल्याचा टोला शेलार यांनी लगावला आहे. त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर निशाणा साधला. या दोन्ही पक्षांनी एकमेकांना मदत होईल याची पुरेपूर काळजी घेतली असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. विलेपार्ल्यात काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेला मदत होणार आहे, त्याप्रमाणेच तिथे तिकीट वाटप झाल्याची टीका शेलार यांनी केली आहे.

पारदर्शकतेची शपथ
मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी दिलेल्या भाजपच्या 227 उमेदवारांनी पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ घेतली. शिवाय, दरवर्षी संपत्ती, मालमत्ता स्रोत घोषित करण्याचीही शपथ यावेळी उमेदवारांनी घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे मुंबईतील 227 उमेदवार हजर होते. भाजपच्या उमेदवारांनी घेतलेली शपथ अशी:-“आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनाकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून मी आज खरा मुंबईकर म्हणून शपथ घेतो की, मी मुंबई महापालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर मुंबईकरांना पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार देण्यास कटिबद्ध राहीन. मी माझी मालमत्ता व उत्पन्नाची माहिती दरवर्षी जाहीर करेन. मी मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत कार्यरत राहीन. जनतेला सदैव उपलब्ध राहीन. मी मुंबईकरांचा सेवक म्हणून काम करेन व प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी या भाजपाच्या ध्येय धोरणानुसार मुंबईकरांसाठी कार्यरत राहीन.”

दात पाडण्याचे काम मी करतो !
तर भाजपला जलीकट्टूप्रमाणे वेसण घालण्याचा पुनरूच्चार करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज भांडूप येथील सभेत पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. नोटाबंदीसह विविध मुद्यांवरून हल्लाबोल करत त्यांनी शिवसैनिकांना ‘तुम्ही वज्रमूठ द्या…मी दात पाडण्याचे काम करतो !’ असे आवाहन करत आपलाच विजय होत असल्याचा दावा केला. भांडूप येथील सभेत उध्दव ठाकरे यांनी नोटाबंदीवरून केंद्र सरकारवर टीका केली. नोटाबंदमुळे सर्वसामान्य नागरिक भरडले गेले असून धनदांडग्यांनी मात्र काळा पैसा चलनात आणला आहे. यामुळे बेरोजगारी वाढत असतांना दुसरीकडे उद्योगपतींना कर्ज माफ करण्यात येत असल्याच्या विरोधाभासाकडे त्यांनी लक्ष वेधले.

बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील बंडखेारांना थंड करण्यासाठी आजचा रविवार सर्व राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींना खर्ची करावा लागला. मंगळवार 7 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने, राजकीय कार्यक्रमाची धामधूम असतानाही पक्षाचे नेतेमंडळी बंडोबांना थंड करण्यात गुंतले होते. त्यामुळे रविवारचा दिवस हा सर्व पक्षांसाठी सेटींगचा दिवसच ठरला.महापालिकेची निवडणूक 21 फेब्रुवारीला होत आहे. प्रचारासाठी कमी दिवस असल्याने सर्वच पक्षांसाठी एक एक दिवस महत्वाचा आहे. रविवार असल्याने पक्षाचे विविध कार्यक्रम होते मात्र प्रत्येक दिवस हा महत्वाचा असल्याने आजचा दिवस हा बंडोबाना थंड करण्यासाठीच प्राधान्याने देण्यात आला. तर अनेक बंडखोर हे नॉट रिचेबल झाले होते. पक्षश्रेष्ठींमध्ये चिंता वाढली आहे.

सेनेला डोकेदुखी
शिवसेनेत मोठया प्रमाणात बंडखोरी झाली आहे. माहीम येथील प्रभाग क्रमांक 190 मधून शिवसेनेकडून वैशाली पाटणकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या महिला शाखाप्रमुख रोहिता ठाकूर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक 200 येथूनही सेनेत बंडखोरी झाली असून महिला शाखाप्रमुख उर्मिला पांचाळ यांच्याविरोधात माजी शाखाप्रमुख अभिषेक सावंत यांच्या पत्नी अदिती सावंत उमेदवारी रिंगणात उतरल्या आहेत. प्रभाग क्रमांक 201 मधून अश्विनी दरेकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी शाखाप्रमुख धनश्री प्रदीप पवार यांनी अपक्ष अर्ज भरला. वॉर्ड क्रमांक 194 मधून आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकराच्या विरोधात महेश सावंत यांनी अपक्ष उमेदवार भरला आहे. तर, प्रभाग क्रमांक 202 मध्ये माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या विरोधात शिवसेनेच्या दोन महिला कार्यकर्त्यांनी अपक्ष फॉर्म भरुन बंडखोरी केली आहे. वरळी कोळीवाडा वॉर्ड क्र. 193 मधून विद्यमान नगरसेविका आणि शिक्षण समिती अध्यक्षा हेमांगी वरळीकर यांच्या विरोधात बंडखोरी करण्यात आली आहे.

शिवसेना-काँग्रेसने ठणकावले
मुंबईत महानगर पालिका तर उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. या तिन्ही ठिकाणच्या निवडणुका स्वबळावर लढवत असलेल्या भाजपवर शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष जोरदार टीका करत आहेत. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये भाजपने शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले आहे. याच मुद्द्यावर आता शिवसेने पाठोपाठ काँग्रेसही आक्रमक झाली आहे. उत्तर प्रदेश-पंजाबमधील आश्वासन महाराष्ट्रातही पाळा, अशा शब्दांत शिवसेना-काँग्रेसने भाजपला ठणकावले आहे. आधी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले तर आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी प्रसिद्धीपत्रक काढून भाजपला सुनावले आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दोन वर्षांमध्ये राज्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे कर्जमुक्तीशिवाय शेतकर्‍याला आधार देण्याकरिता कोणताही उपाय शासनाकडे शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे आतातरी शेतकर्‍याना कर्जमाफी मिळायलाच हवी, अशी मागणी सचिन यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे