मुंबई: राज्यातील शिवसेना खासदारांची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ८ रोजी दुपारी १२ वाजता मातोश्री निवासस्थानावर खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांना सांगण्यात आले होते. परंतु, आज सकाळी अचानकपणे ही बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक नेमकी कशामुळे रद्द करावी लागली याची माहिती अद्याप सेनेकडून सांगण्यात आली नाही.
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या खासदारांनी सभागृहात नेमके कशाप्रकारे कामकाज करायला हवे, संसदेमध्ये सादर होणाऱ्या वेगवेगळ्या विधेयकांबाबत नेमकी काय भूमिका असायला हवी, याची व्यूहरचना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची आज मातोश्रीवर बैठक बोलावली होती. मातोश्रीवर दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास ही बैठक होणार पार पडणार होती.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना-भाजप यांचे संबंध सध्या कटुतेवर पोहोचले आहेत. पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी गेलेल्या उद्धव ठाकरे आणि मोदी हे दोघे केवळ १० मिनिटे सोबत होते. संसदेच्या अधिवेशनात भाजपला विरोध करण्यासाठी सभागृहात शिवसेनेच्या खासदारांनी कशा प्रकारची भूमिका घ्यायला हवी, संसदेत सादर होणाऱ्या विविध विधेयकांवर तसेच इतर मुद्द्यांवर खासदारांनी कशा प्रकारचे भाष्य करायला हवे, एखादे विधेयक मंजूर होण्यापासून रोखायचे झाल्यास काँग्रेसला मदत करायला हवी की स्वतंत्रपणे विरोध करायला हवा यावर आजच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते.