खासदार आढळराव-आमदार महेश लांडगे यांच्यात जुंपणार?
पिंपरी-चिंचवड : महापालिका कार्यक्षेत्रात समाविष्ट गावांच्या 425 कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांत तब्बल 90 कोटींची लूट झाल्याचा अत्यंत गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंग बारणे यांच्यासह महापालिकेतील गटनेते व शहरप्रमुख राहुल कलाटे, सुलभा उबाळे यांनी केल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. परंतु, या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचे रविवारी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने टाळले. समाविष्ट गावांतील विकासकामांसाठी 425 कोटी रुपयांचा निधी आणण्यात आल्यानेच खा. आढळराव यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका मात्र आ. महेश लांडगे यांच्या निकटवर्तीयांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ आता शिवसेनेनेही समाविष्ट गावांतील विकासकामांचा धसका घेतला असून, शिवसेनेच्या खासदारांना तब्बल महिनाभरानंतर जाग आली आहे, असेही हे निकटवर्तीय म्हणाले. त्यामुळे नजीकच्या काळात भोसरीचे आ. महेश लांडगे व खा. आढळराव यांच्यात चांगलेच वाक्युद्ध रंगण्याची शक्यता आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने महापालिकेत 20 वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या 18 गावांतील रस्ते आणि आरक्षणांच्या विकासकामांना प्राधान्य दिले आहे. यापूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात ही गावे विकासापासून वंचित राहिली होती. रस्ते व आरक्षणे विकसित करण्यासाठी 425 कोटी रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांची अनुक्रमे महापालिका व खासदारकीसाठीची व्होट बँक धोक्यात आली आहे. या रस्तेकामांसाठी 60 टक्केच जागा ताब्यात असताना मनपा आयुक्तांनी 425 कोटी रुपयांची कामे काढली अशी टीका करत, खा. आढळराव पाटील यांनी निविदा प्रक्रियेत 90 कोटी रुपयांची लूट झाल्याचा आरोप केला होता. आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी भाजपनेत्यांच्या सहाय्याने महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे, असा आरोपही खा. आढळराव, खा. बारणे या ज्येष्ठ नेत्यांनी काल केला होता. तथापि, या आरोपांना भाजपच्या नेत्यांनी रविवारी काहीही प्रत्युत्तर दिले नाही. आ. लांडगे यांच्या निकटवर्तीयांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. 90 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करताना, त्यांना एकाही भ्रष्टाचाराचा पुरावा देता आला नाही. केवळ मोघम आरोप करण्यात धन्यता मानली, असे उत्तर या निकटवर्तीयांनी दिले.
आ. लांडगेही आक्रमक होणार?
आगामी लोकसभा निवडणुकीत भोसरीचे आमदार महेश लांडगे हे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात शिरुर मतदारसंघातून उभे राहणार आहेत. या मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघातील काही गावांचाही समावेश आहे. 425 कोटींतील बहुतांश रक्कम ही या गावांतील रस्ते व इतर विकासकामांवर खर्च होणार आहे. त्यामुळे खा. आढळराव यांच्या व्होट बँकेला आ. लांडगे हे मोठा धक्का देणार आहेत. त्यातच खा. आढळराव यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करून आ. लांडगे यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविला. त्यामुळे खा. आढळरावांच्या आरोपानंतर आता आ. लांडगेदेखील आक्रमक होतील. परिणामी, नजीकच्या काळात या दोघांमध्ये चांगलेच वाक्युद्ध भडकण्याची शक्यता आहे, असे राजकीय सूत्राने सांगितले.