शिवसेना खासदाराला पराभूत करण्यासाठी सेनेच्याच आमदाराने केले प्रयत्न

0

मुंबई-गेल्या लोकसभा निवडणुकीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आपल्या पराभवासाठी पक्षविरोधी काम केले होते, असा गौप्यस्फोट केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केला. मात्र काही दिवसाने आपल्याकडे येऊन दिलगिरी व्यक्त केली व मुलाला विधानसभेत निवडून आणण्याकरिता मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यावर तुम्ही जरी मला राजकीय आयुष्यातून उठविण्यासाठी प्रयत्न केले असले तरी मी मात्र तुमच्या मुलाला आमदार करेन असा शब्द देतो असे त्यांनी सांगितले. शिवसैनिक कसा असतो हे सांगण्यासाठी गीते यांनी दिलेल्या या उदाहरणामुळे रामदास कदम पक्षविरोधी काम करत होते हे शिवसेनेच्या नेत्यानेच उघड केले.

औरंगाबादचे माजी पालकमंत्री रामदास कदम आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद उघड होता. हा वाद विकोपाला जाऊ लागल्यानेच अखेर रामदास कदम यांना  औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरून दूर करण्यात आले. शिवसेना शाखेच्या वर्धापनदिनी गीते यांना निमंत्रित करून खैरे यांनी रामदासभाईंच्या विरोधातील जुने हिशेबच चुकते केले. गीते यांना वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी बोलाविणे आणि त्यांच्या तोंडून पर्यावरणमंत्र्यांचा जुना किस्सा सांगितला गेल्याने औरंगाबादमधील कदम समर्थकांना कानटोचणी मिळाली.