शिवसेना गुजरातच्या आखाड्यात!

0

गुजरात निवडणुकीत 40 जागा लढविणार; राजकीय खेळीमुळे भाजपच्या अडचणी वाढल्या

मुंबई: गुजरात विधानसभा निवडणूक लढवणार नाही, या भूमिकेवर ठाम असलेल्या शिवसेनेने आता आपली भूमिका अचानकपणे बदलली. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये शिवसेनेने 40 जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात भाजपने कोंडीत पकडत डिवचल्याने संतापलेल्या सेना नेतृत्वाने गुजरात निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केली. शिवसेना खासदार अनिल देसाई हे अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेनेच्या या राजकीय खेळीमुळे भाजपच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. कारण येथे काँग्रेस आणि पाटीदार नेत्यांच्या आव्हानामुळे भाजप अगोदरच त्रस्त आहे. त्यातच आता शिवसेनेचे आव्हान उभे ठाकले आहे. शिवसेनेमुळे भाजपच्या हिंदुत्ववादी व मराठी मतांत उभी फूट पडणार आहे.

सुरत, राजकोट लक्ष्य
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये शिवसेनेने 40 जागा लढण्याचा निर्णय घेतल्याने हिंदुत्त्ववादी मतांमध्ये फूट पडून बालेकिल्ल्यातच भाजपला फटका बसण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. शिवसेनेची एक टीम आखाड्याची घोषणा आणि डावपेच रचण्यासाठी गुजरातमध्ये पोहोचल्याचे सुत्रांनी सांगितले. शिवसेना नगरसेविका राजूल पटेल आणि हेमराज शहा हे या टीमचे नेतृत्त्व करणार करत आहेत. गुजरातमधील राजकीय परिस्थिती आणि लढवण्यात येणार्‍या जागांचा आढावा ही टीम घेणार आहे. शिवसेना गुजरातमधील सुरत आणि राजकोटमध्ये मोठ्याप्रमाणावर उमेदवार उभे करणार आहे. या भागात मराठी भाषिकांचे प्रमाण जास्त असल्याने आम्ही त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे राजूल पटेल यांनी सांगितले.

हिंदुत्त्ववादी मतांमध्ये फूट
आम्ही गुजरातमध्ये कुणासोबतही आघाडी किंवा युती करणार नाही. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्याशी शिवसेनेचे चांगले संबंध आहेत. मात्र तरीही कोणताही निर्णय उद्धव ठाकरेंकडूनच घेतला जाईल, असे राजूल पटेल यांनी सांगितले. गुजरातमध्ये भाजपला आव्हान देण्याच्या शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढू शकते. शिवसेना हिंदुत्त्ववादी मतांमध्ये फूट पाडण्यात यशस्वी झाल्यास त्याचा थेट फटका भाजपला बसू शकतो.