शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांचा राजीनामा

0

कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा महापौर आणि पालिका आयुक्त पी. वेलारसु यांच्याकडे सुपूर्द केल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. कर विभागाकडून नागरिकांना वेठीस धरत कर आकारणी केली जात आहे. दुसरीकडे पाणी चोरीच्या बाबतीत कारवाईची मागणी अनेक वर्षापासून करत असतानाही पाणी चोरीचा प्रश्‍न प्रशासनाने मार्गी लावलेला नाही. तसेच फेरीवाला प्रश्‍नी उपोषण केल्यानंतरही प्रशासनाने अद्याप यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पालिका अधिकारी जन्म मृत्यू दाखल्यात देखील टक्केवारीचे राजकारण करत असून वारंवार याबाबत महासभेत आवाज उठविल्या नंतरही आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असून आपल्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी आपली बाजू घेत नसल्याची खंत वामन म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

अधिकार्‍यांना प्रश्‍न विचारल्यावर त्याची उत्तरे मिळत नाही
याबाबत आपल्या पक्षाचे नगरसेवक आणि पालिका अधिकारी आपल्याला सहकार्य करत नसल्याचा आरोप करत पालिकेतील टक्केवारीच्या राजकारणाला कंटाळलो असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. नगरसेवक असतानाही जर लोकांची कामे मार्गी लागत नसतील आणि आपल्या प्रभागातील नागरिकांवर अन्याय होत असून याबाबत अधिकार्‍यांना प्रश्‍न विचारल्यावर त्याची उत्तरे मिळत नसल्यामुळे आपण उद्विग्न होत आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त आणि महापौरांकडे सुपुर्द केला असून आपला राजीनामा मजूर करण्याची मागणी डोंबिवली पश्‍चिमेकडील नगरसेवक वामन म्हात्रे यांनी केली आहे. वामन म्हात्रे यांच्या राजीनाम्याबाबत महापौर आणि पालिका आयुक्त आणि महापौर कोणता निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.