कल्याण : शिवसेनेची सध्याची अवस्था दोन तोंडाच्या गांडुळासारखी झाली आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कल्याणमध्ये केली. केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेचा संसार करायचा आणि मग त्यांच्यावरच टीका करून वेगळी भूमिका घेतल्याचा आव आणायचा, हे शिवसेनेचे नाटक आहे, असेही पवार म्हणाले. शिवसेना दोन्ही बाजूने ढोल बडवते आहे. एकीकडे सत्तेची मजा चाखायची आणि दुसरीकडे भाजपविरोधात भूमिका घेऊन आम्ही जनतेसोबत आहोत, शेतकर्यांसोबत आहोत असेही भासवायचे, मात्र जनतेला आता हा दुटप्पीपणा लक्षात आला आहे, असा टोलाही पवारांनी हाणला.
15 वर्षानंतर मिळालेली सत्ता ते सोडणार नाहीत!
केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत राहून त्यांच्यावरच टीका करणार्या शिवसेनेला अजित पवार यांनी चपराक लगावली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी अजित पवार आणि इतरही नेते शनिवारी कल्याणमध्ये होते. तिथे त्यांनी आधी पक्षाच्या पदाधिकार्यांचे कान उपटले, त्यांना उपदेशाचे धडे दिले आणि नंतर भाजप-शिवसेनेचा समाचार घेतला. दोघे एकमेकांवर कुरघोड्या करत असले, धमक्या देत असले तरी 15 वर्षांनंतर मिळालेली सत्ता ते सोडणार नाहीत, असा टोमणाही याप्रसंगी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मारला. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर आम्हाला चार महिन्यात सत्ता मिळाली होती. मात्र भाजप आणि शिवसेनेला 15 वर्षांनी सत्ता मिळाली आहे, मोदी लाटेमुळे विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला, मात्र आम्ही खचून जाणार नाही नवी उभारी घेऊ, असेही पवारांनी स्पष्ट केलेे. शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. शेतकरी अजूनही नाराज आहेत, कारण सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरीही त्यातला गोंधळ अजूनही संपलेला नाही. मुख्यमंत्री एक बोलतात आणि त्यांचे मंत्री दुसरीच भाषा वापरतात, मंत्र्यांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ताळमेळ असलेला दिसून येत नाही, असे सांगून पवारांनी फडणवीसांनाही आडव्या हाताने घेतले.
काय म्हणाले अजित पवार…
* जेव्हा घाण असते, तेव्हा माश्या येतात. तुम्ही असल्या लोकांना निवडून दिलेत, त्यामुळेच कल्याणमध्ये माश्यांचे राज्य.
* शिवसेनेला सत्तेची ऊबही घ्यायचीय आणि सरकारविरोधात आंदोलनही करायची आहेत. हे म्हणजे गांडुळासारखे झाले. दुतोंडी.
* राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठी माणसाचा मुद्दा आणणारे आता कुठे गेले? टाळे लागले, घरी बसले.
* बारामतीला कोणतीही लाट हलवू शकत नाही. कारण पक्षाची बांधणी मजबूत आहे. तशी ती सगळीकडे झाली पाहिजे.
* जनतेने भाजपला मते दिली, पण काय मिळाले? महागाई कमी झाली का?, देशात काही बदल दिसतोय का?, नोटाबंदीने काय साधले यावर कुणीच का बोलत नाही?
* आजूबाजूचे देश आज भारतावर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करताहेत. जे सुरू आहे, ते देशाला परवडणारे नाही.