स्मार्ट सिटी संचालक पदाच्या मुद्द्यावर मात्र चर्चा नाहीच
पिंपरी-चिंचवड : शहरातील शिवसेना पदाधिकार्यांची गुरुवारी मुंबईत ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा दारूण पराभव झाल्यामुळे ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकार्यांची कानउघाडणी करत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना केल्या. स्मार्ट सिटी संचालक पदावरून शिवसेनेत सुरू असलेल्या अंतर्गत वादावर कोणत्याही प्रकारचा तोडगा या बैठकीत निघाला नाही. या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, नगरसेवक नीलेश बारणे, प्रमोद कुटे, अमित गावडे उपस्थित होते.
प्रमोद कुटेंची कणखर भूमिका
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या संचालक पदावरून शिवसेनेत अंतर्गत वाद सुरू आहे. भाजपने स्मार्ट सिटीवर संचालक म्हणून शिवसेनेच्या प्रमोद कुटे यांची नियुक्ती केली आहे. मात्र, कुटे यांच्या निवडीला शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी आक्षेप घेतला आहे. मुंबईतील बैठकीत स्मार्ट सिटी संचालक पदाचा मुद्दा उपस्थित झाला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यावर चर्चेस नकार दिल्याची माहिती आहे. बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत स्मार्ट सिटी संचालक पदाबाबत चर्चा झाली. स्मार्ट सिटीचे संचालक प्रमोद कुटे यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. स्मार्ट सिटीचे संचालक पद नव्हे; तर नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याची त्यांनी भूमिका मांडली. त्यामुळे मुंबईतील बैठकीतदेखील याबाबत तोडगा निघाला नाही.