अहमदनगर मनपा पोटनिवडणुकीला रक्तरंजित वळण
दोन शिवसेना पदाधिकार्यांची गोळ्या झाडून, कोयत्याने वार करून निर्घृण हत्या
अहमदनगर : राज्यातील महापालिका पोटनिवडणुकांचे निकाल शांतते लागले असताना, व प्रत्येक राजकीय पक्षाने आपआपला गड सांभाळला असताना, अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणूक निकालाला मात्र रक्तरंजित वळण लागले आहे. केडगाव प्रभागातील पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजयी झाला तर शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. निवडणूक काळात विरोधात प्रचार केल्याचा राग मनात धरून शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची सायंकाळी सहा वाजता भरचौकात गोळ्या झाडून व नंतर कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. केडगाव उपनगरातील सुवर्णनगर येथे हे हत्याकांड घडले. या घटनेनंतर नगर शहरात एकच खळबळ उडाली. केडगावात संतप्त शिवसैनिक रस्त्यावर उतरले व त्यांनी जोरदार दगडफेक करण्यास सुरुवात केली. संपूर्ण केडगावात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तरीही धुसफूस सुरुच होती. बराचवेळ मृतदेह चौकात पडून होते, घटनेनंतर पटापट दुकाने बंद करण्यात आली तर नागरिकांनी घरे बंद करून घेतली होती. काँग्रेसचा विजयी उमेदवार हा या परिसरात प्रचंड दहशत असलेल्या भानुदास कोतकर याचा भाऊ असून, या कोतकरला एका हत्याकांडात जन्मठेप झालेली आहे. कोतकरच्या दहशतीविरोधात शिवसेनेने ही पोटनिवडणूक लढविली होती.
शिवसेनेने दिले होते कोतकरच्या दहशतीला आव्हान
भानुदास कोतकर याच्या दहशतीला आव्हान देत, शिवसेना उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांनी केडगाव प्रभागातून महापालिकेच्या पोटनिवडणुकीत विजय पठारे हा उमेदवार उभा केला होता. या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झाले तर निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. त्यात कोतकर यांचा भाऊ विशाल कोतकर (काँग्रेस) हा दोन हजार 340 मते घेऊन विजयी झाला. तर शिवसेनेचे पठारे यांना एक हजार 886 मते पडली. भाजपच्या महेश सोले यांना केवळ 156 मते पडली. या निवडणुकीत शिवसेना उपशहरप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांनी विशाल कोतकर यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला होता. त्या रागातून निकालानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास केडगाव येथील गजबजलेल्या चौकात या दोघांना गाठून अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला, तसेच कोयत्याने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. एकीकडे विशाल कोतकर यांची विजयी मिरवणूक सुरु असताना दुसरीकडे हे दुहेरी हत्याकांड घडविण्यात आले. त्यामुळे नगर शहरासह राज्यात एकच खळबळ उडाली होती. नगरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून, शिवसैनिकांनी केडगावमध्ये जोरदार दगडफेक केली होती.
पाठलाग करून मारले!
दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काही जणांनी संजय कोतकर व वसंत ठुबे यांचा वाहनावरून पाठलाग केला. त्यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या आणि नंतर कोयत्याने वार करण्यात आले. या दोघेही ठार झाले. या दोघांचे मृतदेह बराचकाळ रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. दहशतीमुळे कुणीही पुढे येण्यास तयार नव्हते. काही वेळाने पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिस व शिवसेनेचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवायची ठरल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती, आणि ती अशी रक्तरंजित ठरली. महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या शिवसेनेला केडगावची जागा व दोन पदाधिकारी या निवडणुकीत गमवावे लागले आहे, तर कोतकर यांची शहरातील दहशत पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे. फरार झालेल्या मारेकर्यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.