शिवसेना प्रवेशाचा विषयच नाही; खडसेंचे स्पष्टीकरण

0

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे हे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील एकनाथराव खडसे आमच्या संपर्कात आहेत असे विधान केले होते. मात्र याबाबत ‘दैनिक जनशक्तिने’ एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता, खडसे यांनी शिवसेना प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले. मी भाजपात असून शिवसेनेत प्रवेश करण्याचा विषयच येत नाही असे खडसे यांनी सांगितले. आज होणाऱ्या शपथविधी संदर्भात काल बुधवारी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या असे देखील खडसे यांनी सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ८० तासात कोसळल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी हे सरकार टिकणार नाही असे मला अपेक्षित होते असे विधान केले होते. त्यानंतर त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका देखील केली होती. आम्हाला दूर केले नसते तर भाजपवर आज जी वेळ आली आहे ती आली नसती असे विधान खडसे यांनी केले होते. ज्यांच्या विरोधात आम्ही कायम लढत आलो, त्यांच्यासोबत सरकार बनविण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला, तो योग्य नव्हता असे खडसे यांनी सांगितले होते.

यंदाच्या विधानसभेला भाजपने खडसे यांना उमेदवारी न देता त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. मात्र रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. उमेदवारी न दिल्याने खडसे भाजपवर नाराज असून ते पक्ष सोडणार अशी देखील चर्चा आहे. मध्यंतरी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र आता ते शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा आहे.