पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर व शिरुर लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार रणनीती आखली जात असून, शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाडण्यासाठी आतापासून राजकीय व्यूहरचना तयार केली जात आहे. पुढील लोकसभेवर मावळमधून विद्यमान भाजप आमदार लक्ष्मण जगताप तर शिरुरमधून आ. महेश लांडगे यांना पाठविण्यासाठी ही रणनीती तयार केली जात आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या सत्तीय राजकारणात सद्या जोरदार कुरघोड्यांना ऊत आलेला आहे. त्याचे पडसाद महापालिका कारभारातही पहावयास मिळत आहेत. चिंचवड, पिंपरी, भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघासह मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी कुरघोडीय राजकारणातून शिवसेना नेत्यांचे खच्चीकरण व भाजप नेत्यांना ताकद देण्यात येत असल्याने शिवसेना व भाजपमध्ये अस्तित्वाची लढाई सुरु झालेली आहे. दुसरीकडे, महापालिकेच्या सत्तेत बाहेरून आलेल्यांना सत्तेचा मलिदा मिळत असला तरी, निष्ठावंतांपर्यंत सत्तेची ‘फळे’ पोहोचत नसल्याने निष्ठावंतांची धुसफूस मात्र चांगलीच वाढली आहे.
स्थानिक, राज्य व केंद्रातील सत्तेतून भाजपनेत्यांना ताकद
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणात भाजपविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष रंगत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसला आता शिवसेनेची साथ मिळू लागली आहे. शिवसेना व भाजपमध्ये 2018 मध्येच मध्यावधीची शक्यता असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसह आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी आतापासून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. चिंचवड, पिंपरी, भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघासह मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने महापालिकेतील सत्तेसह राज्यातील सत्तेचा पुरेपूर वापर चालवलेला आहे. तसेच, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची राजकीय गोची करण्याची खेळीही खेळली जात आहे. भाजपचे सहयोगी आमदार महेश लांगडे यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिरुर लोकसभा मतदारसंघात राजकीय ताकद देत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची राजकीय अडचण केली जात आहे. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने या सत्तेचा वापर हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी करण्याचा सपाटा लावला असून, त्यामुळे स्थानिक शिवसेना पदाधिकार्यांवर कुरघोड्यांचे राजकारण केले जात आहे. पवार काका-पुतण्याच्या तालमीत तयार झालेले नेतृत्व आयात करून त्यांच्यामार्फत स्थानिक सत्ता ताब्यात घेतल्यामुळे भाजपला ऊर्जितावस्था आली असली तरी, त्यामुळे मात्र भाजपमध्ये निष्ठावंत व उपरे असा निर्माण झालेला संघर्षही सद्या शहरात चिंतेचा विषय झालेला आहे.
सीमा सावळे भावी आमदार? आझमभाईंचे पुनर्वसन कसे?
खरे तर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा प्रमुख राजकीय शत्रू राष्ट्रवादी काँग्रेस आहे. परंतु, राष्ट्रवादीपेक्षाही भाजप व शिवसेनेतील राजकीय वैर चांगलेच वाढलेले दिसून येत आहे. फेब्रुवारीत झालेल्या महापालिका निवडणुकीत हे दोन्हीही पक्ष स्वतंत्र लढले होते. शिवसेनेला जेमतेम नऊ नगरसेवक मिळाले तर भाजपने तीनवरून 77 वर मजल मारली होती. विधानसभा व लोकसभेची गणिते वेगळी असली तरी या मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे या ताकदीचेच खच्चीकरण करण्याची खेळी भाजप खेळत आहे. मावळ व शिरुरमध्ये सलग दोनवेळा शिवसेनेचे खासदार निवडून आलेत. तर पिंपरीत शिवसेनेचे आमदार निवडून आलेत. शिवसेनेचे उमेदवार चिंचवड व भोसरीत दुसर्या क्रमांकावर होते. आता सर्व मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. आ. चाबुकस्वार यांच्याविरोधात स्थायीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांना उभे करण्याचे भाजपचे नियोजन असून, मावळमधून लक्ष्मण जगताप व शिरुरमधून महेश लांडगे यांना उभे केले जाणार आहे. लोकसभेसाठी लांडगे यांना निवडून आणण्याच्या बदल्यात भोसरीतून विलास लांडे यांना मदत करण्याचे गणितही मांडून पाहिले जात आहे. गत विधानसभा निवडणुकीत आ. जगताप यांच्याविरोधात राहुल कलाटे हे उभे राहिले होते. यावेळेस कलाटे यांच्याविरोधात एकनाथ पवार किंवा नामदेव ढाके यांच्या नावाची चाचपणीही भाजपकडून केली जात असल्याचे भाजपच्याच वरिष्ठस्तरीय सूत्राने सांगितले आहे. याचमुळे महापालिकेत कलाटे यांचे पंख छाटण्याची खेळीही भाजपकडून खेळली जात असल्याचेही सांगण्यात आले. या सर्व राजकीय खेळीत आझमभाई पानसरे यांचे राजकीय पुनर्वसन भाजप कसे करणार? याकडेही राजकीय धुरिणांचे लक्ष लागलेले आहे.