पिंपरी-चिंचवड (बापू जगदाळे) : लोकसभा निवडणुकीला अजून दोन वर्षाचा अवधी आहे. तरीही लोकसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र पाहता शहरातील प्रमुख पक्षातील नेतेमंडळींनी तयारीला सुरूवात केली आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे शिवसेनेचे आहेत. आता त्यांच्याविरोधात भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप देखील पुन्हा इच्छुक आहेत. मागील निवडणुक भाजप व शिवसेना युती करुन लढल्यामुळे शिवसेनेचा विजय सोपा झाला होता. पण सध्यातरी ती परिस्थिती नसल्यामुळे या दोघांच्या भांडणात राष्ट्रवादीलाही संधी मिळू शकते. त्यासाठी त्यांना स्थानिकच उमेदवार निवडावा लागेल हेही तितकेच खरे आहे. यामुळे बारणे यांना दुसर्यांदा संसदेत प्रवेश करण्यासाठी आता भाजपाच्या जगताप यांच्याबरोबरच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचाही सामना करावा लागणार हे मात्र नक्की आहे. त्यामुळे मावळचा गढ कायम राखण्यासाठी शिवसेनेला शर्थीने झुंजावा लागणार हे स्पष्ट आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरवात केली असून, पुन्हा मोदी लाटेवरच स्वार होऊन शत प्रतिशतचाच नारा दिला आहे. तसेच देशभरातून 350पेक्षा अधिक जागांचे लक्ष्य प्रचाराचे नियोजन केले जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील शिवसेनेचे व भाजपाचे सबंध पाहता युती होणे अशक्य वाटत आहे. त्या धर्तिवरच ज्या त्या लोकसभा मतदारसंघात तगडा उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा असून सर्वात जास्त 23 जागा भाजपाकडे आहेत. तर शिवसेनेकडे त्या खालोखाल 18 जागा आहेत. त्यामध्येच शहरातील मावळ जागेचाही समावेश होतो. 2009 साली बारामती लोकसभा मतदार संघाची तोडफोड होऊन यामध्ये समावेश असलेला पिंपरी चिंचवडचा भाग नव्यावे अस्तित्वात आलेल्या मावळ मतदार संघाला जोडण्यात आला. तर भोसरीचा भाग शिरुर लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आला. सध्या मावळ व शिरुर दोन्ही लोकसभा मतदारसंघ श्रीरंग बारणे व शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या रुपाने शिवसेनेकडे आहेत. हीच बाब भाजपाला मोठ्या प्रमाणात खटकत आहे. त्यामुळे हे देन्ही मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावून घेण्यासाठी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शिरुरसाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे व मावळसाठी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी तयारी सुरु केली आहे. शिरुर मध्ये लांडगे व आढळऱाव यांच्यातच थेट लढत होईल.
राष्ट्रवादीची मतदार संख्या मोठी
मावळसाठी आता राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचे नाव स्थानिक म्हणून नाव पुढे येत आहे. त्यांनी मागील वेळेस या मतदारसंघासाठी चाचपणी देखील केली होती. यामुळे या मतदारसंघाची जगताप यांच्यासारखीच त्यांनाही माहिती आहे. शेकापची ताकदही यावेळी राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभी राहण्याची शक्यता आहे. मतदारसंघात राष्ट्रवादीला मानणार्या मतदारांची संख्या खूप आहे. तसेच कर्जतमध्ये झालेले पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन ही येथील राजकीय समीकरणे जुळवण्याचा व या ताकदीचाच भाग होता. तसेच 2009 च्या लोकसभा निवडणुकीत आझम पानसरे यांच्या रुपाने शिवसेनेला मोठ्या प्रमाणात टक्कर दिली होती. तर 2014 ला शिवसेनेतून आयात केलेले राहूल नार्वेकर यांना राष्ट्रवादीने मावळमधून उमेदवारी दिली होती. मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवार असलेले नार्वेकर यांनी तरी देखील सव्वादोन लाखांच्या पुढे मते घेऊन सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला होता. शिवसेना व भाजपाच्या भांडणात व सद्यस्थितीला या पक्षावरील लोकांची नाराजी पाहता राष्ट्रवादीला संधी मिळेल असा त्यांचा होरा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी आपली आक्रमकता वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून दाखवत आहे.
या मतदारसंघाचा होतो समावेश
मावळ लोकसभा मतदारसंघमध्ये पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, कर्जत-खोपोली व उरण या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये पिंपरी व उरण हे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे तर चिंचवड, मावळ, पनवेल हे तीन मतदार संघ भाजपाकडे आहेत. तर कर्जत-खोपोली ची जागा राष्ट्रवादी कडे आहे. तर या मतदारसंघातील दोन्ही महानगरपालिका भाजपाकडे व तीन आमदार असल्याने भाजपने या ठिकाणी शिवसेनेपेक्षा आपणच सरस असल्याचा समझ करुन घेतला आहे. तर पिंपरी-चिंचवड शहर हे पुर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता. त्या कारणाने अजूनही लाखो मतदार या ठिकाणी आहेत असे त्या पक्षाचे म्हणने असून, कर्जत मधे देखील पक्षाचा आमदार असल्याने आम्ही नियोजन बध्द प्रचार केल्यास विजय आमचाच आहे असा आत्मविश्वास त्यांना आहे.
अशी आहे मतदारसंघाची रचना
मतदारसंघाची रचना घाटाखाली व घाटावर या दोन प्रकारांत विभागली गेली आहे. घाटावर मावळ, पिंपरी, चिंचवड तर घाटाखाली पनवेल, कर्जत-खोपोली, उरण हे विधानसभा मतदारसंघ आहेत. नव्याने अस्त्विावात आल्यापासून मावळचा खासदार हा शिवसेनेचाच झाला आहे. तो देखील पिंपरी चिंचवड शहराचाच. त्याला कारणही तसेच आहे. कारण पिंपरी-चिंचवड ची मतदारसंख्या ही साडे सात लाखाच्या घरात असून मावळ विधानसभेच्या मतदारसंख्या लक्षात घेता या तिनही भागातील मतदारांची संख्या आकरा लाखाच्यापुढे जाते. त्यातच या तिनही मतदारसंघ भौगोलिक परस्थितीने अतिशय जवळ असल्याने प्रचार यंत्रणा राबवण्यास सोयीचे ठरते त्यामुळे कोणत्याही पक्षाला उमेदवार द्यायचा असेल तर पिंपरी चिंचवड शहरातूनच दयावा लागणार आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या वाघेरे याच्यां इंन्ट्रीने भाजप-सेना उमेदवारांची पर्यायाने जगताप व बारणे यांची विजयाची गणिते चुकणार की काय असे चित्र निर्माण होत आहे.
खासदार बारणे यांचा गढ मजबूतच
नगरसेवक ते खासदार असा प्रवास राहिलेल्या बारणे यांनी लोकसभेमध्ये नेत्रदीपक कामगिरी करत अनेकदा उत्क्रुष्ट संसदरत्न पुरस्कार मिळवला आहे. तर मावळ बरोबरच घाटाखालील आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क टिकवून ठेवला आहे. तसेच अनेक कामांसाठी वितरीत केलेला निधी हे देखील त्यांच्या जमेच्या बाजु आहेत. त्यामुळे नव्या उमेदवारांना अपरिचीत असलेल्या मतदारसंघात बारणे यांचा नेहमीचाच वावर त्यांना पुन्हा विजया पर्यत घेऊन जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात येते.
जगताप यांनादेखील विजयाची आशा
मागील वेळेस शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर निवडणुक लढवत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपला प्रभाव या मतदारसंघातील मतदारांना दाखवला होता. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार व त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धक बारणे यांच्या विरोधात त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. पण सध्या ते भाजपाचे उमेदवार असल्यामुळे पक्षाची ताकद व स्वताकदीचा मिलाप होऊन विजयी होण्याची त्यांना आशा आहे. पन घाटाखालील भागात शेकापाचे देखील वर्चस्व आहे. त्यांची ताकद या वेळी राष्ट्रवादीच्या पाठीमाघे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही एक अडचण जगतापांना विजयात अडसरा ठरणार आहे.