शिवसेना याचवर्षी सत्तेला लाथ मारणार!

0

आदित्य ठाकरेंनी ठणकावले

अहमदनगर : कोणत्याही कार्यक्रमाला गेलो की तेथील नागरिक विविध मागण्यांची निवेदने देतात. समाजातील कोणताही घटक सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. शिवसेना सत्तेत पहारेकर्‍याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे यावर्षी कदाचित सत्तेला लाथ मारू, असे सूतोवाच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी अहमदनगरमध्ये केले. सत्तेतून बाहेर पडण्याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगर येथील सावडी उपनगरात ठाकरे यांचा रोड शो आणि सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपवर नाव न घेता टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत मात्र त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. गुजरातमधील सभांमध्ये खुर्च्या रिकाम्या दिसतात. तसे शिवसेनेच्या कोणत्याही सभेत होत नाही, असा टोलाही ठाकरे यांनी हाणला. शिवसेना विरोधी पक्षात नाही, परंतु सत्तेत पहारेकरी आहे. चांगल्या कामांचे कौतुक करतानाच चुकीच्या कामांना रोखण्याचे काम केले जाते, असेही ते म्हणाले.

पुढील काळात शिवसेनेचीच सत्ता!
न्यू आटर्स महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर आदित्य ठाकरे रॅलीद्वारे सभास्थानी आले. तेथे युवकांच्या गराड्यातून सभास्थानी गेले. सभेत बोलताना त्यांनी नगर शहराचे प्रश्न सोडविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. ठाकरे म्हणाले, विद्यार्थी, महिला, व्यापारी कोणीही सत्ताधार्‍यांवर खुश नाही. नोटाबंदीच्या काळात एकही श्रीमंत व्यक्ती रस्त्यावर दिसली नाही. काळा पैसा बाहेर निघाला नाही, पण महिलांनी बचत करून ठेवलेले पैसे काळे धन म्हणून दाखवले गेले. शेतकर्‍यांना कर्जमुक्ती हवी आहे, पण कर्जमाफीही धड दिली जात नाही, त्यामुळे याचवर्षी शिवसेना सत्तेला लाथ मारणार आहे. याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. पुढील काळात सत्ता शिवसेनेचीच येणार, असा दावाही ठाकरे यांनी केला. दरम्यान, शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शिवसेनेकडून 11 लाखांची मदत जाहीर केली. शहर उपनेते अनिल राठोड यांनी मदतीचा धनादेश आदित्य ठाकरेंकडे सुपूर्त केला.