मुंबई : भारतीय जनता पक्ष शिवसेनेला पहिल्या क्रमांकाचा शत्रू मानत असेल म्हणूनच पाकिस्तान आणि चीनकडे दुर्लक्ष झाले काय? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे. सामनाला दिलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात त्यांनी राजकारण चुलीत घाला आणि देशाच्या धगधगत्या सीमांची चिंता करा, असे आवाहन देखील सरकारला केले आहे. शिवसेना-भाजपात मतभेद आहेत मात्र राज्याची स्थिरता आणि प्रगतीवर त्याचा परिणाम होऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे. कर्जमुक्ती झाली, पण समृद्धी महामार्गाचा विषय गंभीर आहे. शेतकऱयांचे वाटोळे करून मी ‘समृद्धी’चा बुलडोझर सुपीक जमिनीवर फिरवू देणार नाही, असेही त्यांनी ठणकावले आहे.
नरेंद्र मोदींवर सोडले टीकास्त्र
यामध्ये त्यांनी चीन आणि पाकिस्तानसोबत चाललेल्या सिमावरून देखील सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, चिनी ड्रॅगन आपल्या अंगावरती येतोय. म्हणजे नेमकं आपलं कुठं चुकतंय? पंतप्रधान तर जगप्रवास करताहेत. संपूर्ण दुनिया आता त्यांची मित्र झालेली आहे. पण ती दुनिया जरी मित्र झाली तरी हे दोन शत्रू आपल्याला भारी का पडताहेत? मग आपला एक तरी मित्र या शत्रूंना वठणीवर आणण्यासाठी उघडपणे मदतीला का येत नाहीय? असे सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केले आहेत.
चीनचा धोका जास्त वाढलाय
ठाकरे म्हणाले की, चीन आता आपल्याला सरळ धमकवतोय. त्या ताकदीला टक्कर देण्याएवढी शक्ती ती कमावण्याकडे लक्ष देण्याची आज आपल्याला गरज आहे. देशाच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करून फक्त निवडणुका जिंकण्याकडेच लक्ष दिलं जात असेल तर मला वाटतं देशाशी ती प्रतारणाच ठरेल. युद्ध हे युद्ध आहे. समोर चीन आहे. या वेळेला अजून आपल्याला पाकव्याप्त कश्मीर सोडवता आलेला नाहीय. तुम्ही देशातसुद्धा तुमचे मित्र गमावलेले असाल आणि देशाच्या बाहेरचे मित्र तुमच्या मदतीला येतील काय? सगळय़ात मोठा धोका म्हणजे ते शिवसेनाप्रमुख सांगायचे, जर का युद्ध भडकलंच तर देशातली परिस्थिती काय असेल?, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रासाठी कमीपणा घेतलाय
तुमचं भांडण इतक्या टोकाला जाऊनसुद्धा शिवसेना अद्यापि सत्तेत कशी? असा प्रश्न त्यांना विचारला असता , माझ्या महाराष्ट्रासाठी मी कमीपणा घेतलाय असे उत्तर ठाकरे यांनी दिले. ते म्हणाले की, जोपर्यंत मला वाटत नाही की आता यांच्याबरोबर राहण्यात काही अर्थ राहिलाय. काँग्रेसला देशातून घालवावी म्हणूनच आम्हीसुद्धा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. त्याच्यानंतर त्यांनी युती तोडली. जे व्हायचं ते झालं. आणि चांगलं काही घडायचं असेल तर ठीक आहे. या वेळेला आपली सत्ता आली नाही, मग २५ वर्षं जे आपल्यासोबत राहिले त्यांची सत्ता जर येत असेल तर येऊ द्या. आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे काही चांगलं करायचं आहे ते जर का होत असेल तर एकदा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे!, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांसोबत वेडेवाकडे होणार नाही
समृद्धी महामार्गाच्या बाबतीतसुद्धा शिवसेनेची भूमिका अत्यंत स्पष्ट असल्याचे ते म्हणाले . विकासाच्या आड काय आम्ही आलेलो नाही आहोत, परंतु शेतकऱयांचं वाटोळं करून त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करून मी हा समृद्धीचा विकास होऊ देणार नाही. या खात्याला आमचे मंत्री आहेत म्हटल्यावर मी वेडंवाकडं काहीच होऊ देणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. माझ्या राज्याची राजधानी व उपराजधानी जोडणारा हा प्रकल्प आहे. शेतकऱयांच्या जमिनी वाचवूनही हा प्रकल्प पूर्ण करता येईल, असे ठाकरे म्हणाले.