शिवसेना सत्तेसाठी काँग्रेससमोर झुकली: आशिष शेलार

0

मुंबई: सत्तेसाठी शिवसेना कॉंग्रेससमोर झुकली असल्याची टीका भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देशाचे राजकारण चांगले ढवळून निघाले आहे. भाजपा राहुल गांधी यांनी माफी मागावी असे सांगत आहे, तर दुसरीकडे राहुल यांनी माफी मागायला मी काही सावरकर नसल्याचे आपल्या भाषणात सांगितले होते. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ट्वीट करत शिवसेनेवर टीका केली आहे.

“नाही धार ‘सच्चाई’कारांच्या शब्दांना आज दिसली, ‘रोखठोक’लेखणी त्यांच्याकडेच पाहुन म्हणे हसली. सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली. नागू सयाजी वाडीतून का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झाली? छे..छे..झुकली रे झुकली. मराठी बाणा सांगणारी सेना, सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली!”, असे ट्विट करत आशिष शेलार यांनी शिवसेनावर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून भाजपाकडून जोरदार टीका होत आहे. राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेनेदेखील राहुल गांधी यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत तणाव निर्माण होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय, या वक्तव्यावरून भाजपा राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार असल्याची शक्यता आहे.