शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी यांच्या नावाची चर्चा; आज होणार शिक्कामोर्तब

0

मुंबई : देशात एनडीएने लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळविले आहे. एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी ३० में रोजी होणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळ देखील शपथ घेणार आहे. दरम्यान मंत्रीपदी कोणाची वर्णी लागते याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 5 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलविली असल्याचे सांगितले जात आहे. यात शिवसेनेकडून कोणाची वर्णी लागते यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रीमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री तसेच लोकसभेचे उपसभापतीपद मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतर्फे कीर्तिकर, राज्यसभा खासदार संजय राऊत, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, यवतमाळच्या खासदार भावना गवळी, राज्यसभा खासदार अनिल देसाई, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची नावे आघाडीवर आहेत. संजय राऊत व कीर्तिकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते. उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा अडीच लाख मतांनी पराभव केला आहे. अनुभवाने कीर्तिकर ज्येष्ठ आहेत. शिवसेनेतील असलेला त्यांचा प्रदीर्घ अनुभव, स्थानीय लोकाधिकार समितीचा वटवृक्ष करण्यात त्यांचा असलेला सिंहाचा वाटा आहे. तसेच गेल्या लोकसभेतील प्रभावी कामगिरी पाहता त्यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे.