शिवसेनेकडे आवश्यक संख्याबळ; लवकरच सेनेचा मुख्यमंत्री होईल: संजय राऊत

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा उलटला आहे. मात्र अद्यापही सत्ता स्थापनेबाबत कोणतेही चित्र दिसत नाहीये. शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्री पदावरून चढाओढ सुरु आहे. भाजपा-शिवसेना युतीला सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट कौल मिळालेला असतानाही मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटपावरून घोडे अडले आहे. दरम्यान, शिवसेनेकडून दररोज नवनवीन व्यक्तव्य होत आहे. खासदार शिवसेना नेते संजय राऊत यांनी सत्तास्थापनेबाबत पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे. “शिवसेनेकडे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ असून जवळपास १७५ आमदारांचे संख्याबळ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवतिर्थावर शपथविधी होईल,” असा दावा राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकारणात खळबळ उडाली आहे.

पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे. “शिवसेनेला पाठिंबा देणारी संख्या वाढली आहे. कालपर्यंत १७० होती, ती आज १७५ पर्यंत आली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शिवसेना मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा आहे आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतिर्थावर शपथ घेईल. उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत पोहोचले असून, लवकरच गणित माध्यमांसमोर मांडण्यात येईल,” असा दावा त्यांनी केला आहे.

“देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. म्हणूनच त्यांनी परिस्थिती ओळखून युती केली. राज्यातील सत्तेच्या वाटाघाटी त्यांच्यासमोर झाल्या आहेत. मात्र, सध्या शाह यांचे मौन रहस्यमय आहे. हरयाणासारख्या छोट्या राज्यातील तिढा सोडवण्यासाठी शाह यांनी पुढाकार घेतला. हीच गोष्ट महाराष्ट्रात का नाही?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

शरद पवार मुख्यमंत्रीपदापेक्षा मोठे
सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नाही तोच मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव पुढे आले आहे. याबाबत देखील संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. शरद पवार राज्याच्या राजकारणात येणार नाही. शरद पवार मुख्यमंत्रीपदापेक्षा मोठे आहेत, असे त्यांनी सांगितलं.