लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपशी काडीमोड जाहीर!
मुंबई : येत्या 2019मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांत शिवसेना स्वतंत्रपणे स्वबळावरच लढणार असल्याची घोषणा शिवसेना नेते व पक्षाचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केली. मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत हा ठराव बहुमताने पारित करण्यात आला. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनुमतीने ही घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. खा. राऊत यांनीच हा ठराव बैठकीत मांडला होता. भाजप सरकारने तीन वर्षांत देशातील आणि राज्यातील जनतेची फक्त फसवणूक केली. त्यामुळे सरकारसोबत न राहाता स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरावे, असे मत खा. राऊत यांनी व्यक्त केले. त्यांच्या या ठरावाला सर्व उपस्थित नेत्यांनी पाठिंबा देत, हा प्रस्ताव मान्य केला. या घोषणेसोबतच सेनेने 2019च्या निवडणुकांचे रणशिंगदेखील फुंकले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. देशात थापा मारण्याची लाट आली आहे. केवळ सत्तेसाठी भाषणं करून लोकांची फसवणूक केली जात आहे. गायीला मारणे जसे पाप आहे; तसेच थापा मारणेही पाप ठरवलं पाहिजे. या देशात गोहत्याबंदीबरोबरच थापाबंदीही करा, थापा मारणे गुन्हा ठरवून अशा लोकांना तुरुंगात टाका, असा घणाघाती हल्लाही ठाकरे यांनी चढविला. हे सरकार केवळ जाहिरातबाजीवर चालणारे आहे, त्यामुळे जाहिरातबाज सरकार खाली खेचावेच लागेल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
प्रत्येक राज्यात लढू : उद्धव ठाकरे
वरळीत शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. यावेळी सुरुवातीला 4 डिसेंबर 2017 रोजी मातोश्री येथे श्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीचा इतिवृत्तांत वाचून दाखविण्यात आला. शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी 2019ची लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव मांडला. त्याला कार्यकारिणीने तत्काळ मंजुरी दिली. या ठरावाला शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी अनुमोदन दिले होते. या ठरावानंतर उद्धव ठाकरे यांनी, शिवसेना सर्व राज्यांत स्वबळावर निवडणूक लढवेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकही स्वबळावरच लढविली जाईल; सर्व राज्यांत उमेदवार दिले जाईल. आम्ही निवडणूक हरू किंवा जिंकू हे माहित नाही. किती मते पडतील हेही माहित नाही, परंतु आम्ही लढू, असा निर्वाणीचा इशाराही ठाकरे यांनी दिला. हिंदू मतांमध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून इतर राज्यांत निवडणुका लढविल्या नाहीत; परंतु यापुढे प्रत्येक राज्यांत शिवसेना लढेल, असेही ठाकरे यांनी नीक्षून सांगितले. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना नेत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
आदित्य ठाकरे नेतेपदी, मिलिंद नार्वेकर सचिव!
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेना नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मातोश्रीवर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर केलेल्या प्रस्तावाप्रमाणे प्रतिनिधीसभेचे सदस्य आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी निवडणूक 2018च्या शिवसेना नेतेपदासाठी आपले नामांकन भरले होते. त्यावर पक्षाच्या प्रक्रियेनुसार मतदान घेऊन मंगळवारी आदित्य यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या शिवाय, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, केंद्रीय मंत्री अनंत गिते, खासदार आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांचीही नेतेपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. उद्धव यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांची सचिवपदी निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, नार्वेकर यांच्यासह युवासेनेचे सुरज चव्हाण यांचीही सचिवपदी निवड करण्यात आली आहे. अनिल परब, मनिषा कायंदे, अमोल कोल्हे, डॉ. नीलम गोर्हे, अरविंद सावंत यांची पक्षप्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाकरेंची तोफ धडाडली!
– कोरेगाव भीमा दंगलीमागचे अदृश्य हात जेव्हा सापडतील तेव्हा त्यांची होळी केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही.
– अहमदाबादमध्ये रोड शो केला तो काश्मीरमध्ये करायला हवा होता, लालचौकात तिरंगा फडकावयाला हवा होता.
– आज शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, योजनेच्या जाहिराती फार, पण फायदा कुणालाच नाही!
– शेतकर्यांना कर्जमुक्ती द्या, त्यांचा सातबारा कोरा करा, जाहिरातबाज सरकार खाली खेचू.
– भाजपशी फारकत घेण्याशिवाय इतर कोणताही पर्याय दिसत नाही.
– मोदी म्हणजे बोलाचाच भात, बोलाचीच कढी; खरेच अच्छे दिन आले आहेत?
युतीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. शिवसेना बर्याच गोष्टी बोलते. पण, मला यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. पुढच्या निवडणुकीतही आम्हीच जिंकू!
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री