शिवसेनेचं दबावाचं राजकारण वाढतंय!

0

तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना, असा खेळ सध्या राज्याच्या राजकारणात रंगला आहे. तो खेळ सुरू आहे अर्थातच शिवसेना आणि भाजपमध्ये. कधी मनोमिलन तर कधी रुसवा- फुगवा असे भाव अनेक महिन्यांपासून दिसून येतेय. राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यापासूनच भाजपवर प्रहार करण्याची एकही संधी शिवसेनेने सोडली नाही आणि अजूनही सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रित स्नेहभोजन घेतले. त्यानंतर कासवगतीने युती पूर्वपदावर येत आहे, अशी मार्मिक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली होती. त्यामुळे युतीत पॅच झाल्याचीच भावना सर्वत्र पसरली नसेल तर नवलच. पण शिवसेना-भाजपमधील अंतर्गत वाद संपता संपत नाही. सध्या काँग्रेसचे नेते नारायण राणे भाजपच्या वाटेवर आहेत. भाजपही राणे यांना पक्षात घेण्यास इच्छुक आहेत. राणे आणि शिवसेना यांचा तसा पाहिला तर 36चा आकडा आहे. राणे भाजपच्या वाटेवर असल्याने त्या वाटेवर दबावाच्या राजकारण करून काटे पेरण्याची खेळी शिवसेनेला खेळत आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टीत शिवसेनेकडून अडवणूक केली जात आहे.

शेतकर्‍यांची कर्जमाफी आणि तुरीचा विषय सध्या गाजत आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या प्रश्‍नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यभर संघर्षयात्रेच्या माध्यमातून सरकारला कोंडीत पकडण्याची खेळी विरोधकांनी खेळली, तर संघर्षयात्रेला प्रतिउत्तर देण्यासाठी सरकारने संवादयात्रा सुरू केली आहे. यातून शेतकर्‍यांचे प्रश्‍न किती सुटतील हा आता कळीचा मुद्दा बनला आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नाही म्हणून स्वाभिमान शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी रस्त्यात उतरून आंदोलन केले. एकीकडे राज्याच्या सत्तेत स्वाभिमान शेतकरी सहभागी आहेत. कृषी राज्यमंत्रीपद त्यांच्याच संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्याकडे आहे, तर दुसरीकडे त्यांनाच आंदोलन करावे लागत आहे. समृद्धी महामार्गाचा प्रश्‍न गाजतोय. याच प्रश्‍नासाठी मागील आठवड्यात राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गास होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई ते नागपूर 710 किलोमीटर लांबीचा महामार्ग बनवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 10 जिल्हे 33 तालुके आणि 350 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. हजारो शेतकर्‍यांच्या जमिनी या महामार्गात जाणार असल्याने शेतकर्‍यांनी महामार्गाला विरोध दर्शवला आहे. दोन दिवसांपूर्वीच शहापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी रास्तारोको करून याला विरोध दर्शवला. विशेष म्हणजे या आंदोलनात खासदार राजू शेट्टी सहभागी झाले होते. शेतकर्‍यांना कर्जमाफी, समृद्धी महामार्ग इत्यादी प्रश्‍नांवर उद्धव ठाकरे आणि खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या प्रकरणात शिवसेना शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली. शेतकर्‍यांना कर्जमुक्ती केली पाहिजे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर शिवसेनेने भाजपला एकाकी पाडले असतानाच, आता समृद्धी महामार्गावरून शेट्टी ठाकरेंच्या गुफ्तगूमुळे सरकारची कोंडी होणार असल्याचे दिसून येतंय. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने हायवेपासून 500 मीटर अंतरावर मद्यपान विक्री परवाने बंद करण्याचा आदेश दिला होता. त्यावर राज्य सरकारने मुंबईतील पूर्व आणि पश्‍चिम महामार्ग एमएमआरडीएकडे हस्तांतरित केले. त्यामुळे कोर्टाने आदेश देऊनही महामार्गावरील बंद झालेले दारूची दुकान पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पण परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून थेट नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला शिवसेनेने विरोध करीत धक्का दिला होता. राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही भाजपसाठी खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे शिवसेनेला दुखवून चालणार नाही हे भाजप जाणून आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवलं आहे. भागवतांचे नाव सुचवून शिवसेनेने भाजपची कोंडी केली आहे. शेतकर्‍यांची कर्जमाफी, तूर खरेदी यावरून वातावरण पेटलं असतानाच नारायण राणे यांचा भाजप पक्षप्रवेश हा शिवसेनेसाठी सगळ्यात कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळेच शिवसेना दबावाचं राजकारण वाढतंय. राणेंच्या बातमीपाठोपाठ काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांनीही सर्व पदांचा राजीनामा दिलाय. त्यामुळे काँग्रेसमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. विरोधकांपेक्षा सहकारी मित्र पक्षच सरकारला कोंडीत पकडत आहे. त्यामुळे विरोधकांपेक्षा सरकारला मित्रपक्षाची अधिक भीती आहे. शिवसेनेचे दबावाचे राजकारण वाढत आहे. पण भाजपच्या नेते मंडळीला सेनेचे दबावाचे राजकारण कळत नाही अशातला भाग नाही. पण भाजपनेही वेट अँड वॉच भूमिका घेतल्याची दिसून येत आहे.

संतोष गायकवाड – 9821671737