मुंबई : राज्य सरकार म्हणते की, 40 लाख शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. शिवाय, राज्यातील एकूण 89 लाख शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. मात्र सरकारने आम्हाला या सर्व लाभधारक शेतकर्याच्या पत्त्यासह नावांची यादी विधानसभेत उपलब्ध करून द्यावी. खरेच या शेतकर्यांना लाभ मिळाला का हे याची आम्ही विभागवार तपासणी करू, अशी मागणी करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भाजप सरकारला चांगलाच झटका दिला. सरकारने जाहीर केलेले आकडे खरे आहेत हे पटवून द्यावे, सिद्ध करून दाखवावे. असे केले तर आमचा त्यांच्यावरील विश्वास अधिक वाढेल, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. हेवेदावे विसरुन कामाला लागा, असे निर्देशही ठाकरे यांनी नेत्यांना देत निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे शिवसेना इलेक्शन मूडमध्ये आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, 2019 मधील निवडणुकांची जबाबदारी त्यांनी जाहीर केली. विदर्भाची जबाबदारी दिवाकर रावते, पुणेसह उत्तर महाराष्ट्राची संजय राऊत, मराठवाड्याची रामदास कदम, ठाणे आणि कोकणची सुभाष देसाईंकडे जबाबदारी सोपवण्यात आल्याचे ठाकरेंनी जाहीर केले.
सत्ताधारी भाजपची उडविली खिल्ली!
पक्षाच्या विभागप्रमुख व जिल्हाप्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. ठाकरे म्हणाले, पक्षात मतभेद नाही. हेवेदावे विसरुन सर्वांनी कामाला लागावे. जे अंगावर येतील, त्यांना शिंगावर घेण्याची तयारी ठेवावी. सरसकट कर्जमुक्ती हे अराजकतेला आमंत्रण आहे असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर त्यांनी केलेली कर्जमुक्ती सत्यावर आधारित असावी, असे आमचे म्हणणे आहे. भाजपचे आमदार नाना पटोले यांनीही ही कर्जमाफी भ्रामक असल्याचे मत व्यक्त करत साशंकता व्यक्त केली, असे म्हणत ठाकरे यांनी सरकारच्या विश्वासार्हतेवरच प्रश्चचिन्ह उपस्थित केले. राज्यात कर्जमुक्तीचे वातावरण घोंगावत असून, कर्जमाफीचा लाभ 89 लाख शेतकर्यांना मिळणार. तर 40 लाख शेतकर्यांचा सातबारा कोरा होणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण ही आकडेवारी त्यांनी सभागृहात द्यावी. कर्जमाफीचा लाभ घेणार्या शेतकर्यांचे नाव आणि पत्ते विधिमंडळाच्या सभागृहात सादर करावे, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले. राज्यातील किती शेतकर्यांना लाभ मिळाला हे सांगताना तो आकडा राज्याच्या लोकसंख्येहून जास्त येणार नाही याची काळजी घ्यावी, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारची खिल्लीच उडवली.
संरक्षणमंत्रिपदाचा चुनावी जुमला करू नका!
सीमेवर युद्धाचे ढग असून चीनचे आक्रमण व पाकिस्तानची घुसखोरी सुरु आहे. अशा स्थितीत गोव्यातील पोटनिवडणुकीत मनोहर पर्रिकर यांचे विधान दुर्दैवी आहे. पराभव झाल्यास पुन्हा संरक्षणमंत्रिपदावर परतणार असे पर्रिकर यांनी म्हटले आहे. देशाच्या संरक्षणमंत्रिपदाकडे पोकळ पद्धतीने बघू नये असे ठाकरे यांनी सांगितले. सरकारने संरक्षणमंत्रिपदाकडे गांभीर्याने बघितले नाही तर देशात अराजकता माजेल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘चुनावी जुमला’ करुन संरक्षणमंत्रिपद द्यायला नको, असा टोलाही त्यांनी लगावला.