शिवसेनेचा ढोलनाद

0

गत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीची माती झाली होती. याला आता जवळपास तीन वर्षे होत आली आहेत. हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आलेल्या या दोन्ही पक्षांची राजकीय संगत ही एकमेकांना सुसंगत आणि पुरक अशीच होती. किंबहुना स्वातंत्र्योत्तर कालखंडात सर्वात दीर्घ काळापर्यंत चालणार्‍या राजकीय मैत्रीपैकी एक म्हणून युती ओळखली जात होती. तथापि, गत लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवल्यानंतर विविध राज्यांमध्ये ‘शत प्रतशत’चे धोरण आखण्यात आले. यासाठी महाराष्ट्रात शिवसेनेसोबत दीर्घ काळापासून असलेल्या राजकीय मैत्रीचा बळीदेखील देण्यास पुढे-मागे पाहण्यात आले नाही. यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये कधीही फार सलोख्याचे संबंध दिसून आले नाहीत. अलीकडच्या काळात तर शिवसेनेने अतिशय आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. अगदी भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असणार्‍या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून शिवसेनेने आदळआपट केली. बीफच्या संवेदनशील मुद्द्यावर प्रथमच भाजपच्याविरुद्ध भूमिका घेत याबाबत राष्ट्रीय धोरण आखण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेत या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमधील संघर्ष कशा पद्धतीने शिगेला पोहचलाय? हेदेखील जनतेला दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकरी कर्जमाफीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत राज्यभरात 10 जुलै रोजी आंदोलनाची दिलेली हाक ही लक्षणीय अशीच आहे.

मुळात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेनेही पहिल्यापासून अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यातील शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करण्याची आग्रही मागणी या पक्षाने कधीपासूनच लावून धरली आहे. दरम्यान, राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. यासोबत शिवसेनेने मागणी केल्यानुसार शेतकर्‍यांच्या संख्येची माहितीदेखील देण्यात आली. तथापि, एवढ्यावरच न थांबता कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही? हे पाहण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिनव प्रकाराचा अवलंब केला आहे. या अनुषंगाने आता सोमवार दिनांक 10 जुलै रोजी राज्यभरातल्या जिल्हा बँकांसमोर शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांवर कर्ज असल्यास विविध बँका त्यांच्या घरावर नोटीस चिपकवतात, त्यांच्या घरासमोर ढोल-डफ वाजवून त्यांची बदनामी करतात. यामुळे नेमक्या याच पद्धतीने राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेनेतर्फे ढोलनाद करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना आंदोलनाचे आदेशदेखील दिले आहेत. परिणामी आता सोमवारी जिल्हा बँकांसमोर शिवसेनेचा ढोल घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरं तर आंदोलनाचा मुख्य उद्देश ठळकपणे जगासमोर मांडला जावा हे अपेक्षित असते. यासाठी विविध मार्गांचा अवलंब करण्यात येत असतो. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे ढोलनाद आंदोलन हे अभिनव आहे यात शंकाच नाही. हे आंदोलन नक्कीच ‘लक्ष्यवेधी’ ठरणार असले तरी यातून नेमके साध्य काय होणार? हा प्रश्‍न आहेच. याशिवाय काही ठिकाणी याबाबत विचित्र स्थिती उद्भवण्याची शक्यतादेखील आहे. अगदी अलीकडच्या काळापर्यंत सहकारावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र काही प्रमाणात तरी बदलल्याचे दिसून येत आहे.

भाजप व शिवसेनेने सहकारात आपली पाळेमुळे मजबूत केली आहेत. विशेष करून फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक सहकारातील दोन्ही काँग्रेसच्या मिरासदारीला पद्धतशीरपणे संपवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यातच काही जिल्हा बँका भाजपच्या ताब्यात असून काहींमध्ये शिवसेनेचेही संचालक आहेत. यासंदर्भात जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उदाहरण अतिशय बोलके आहे. येथे भाजप, शिवसेना व अन्य पक्षांची एकत्रित सत्ता आहे. या बँकेच्या अध्यक्षा भाजपच्या असल्या तर उपाध्यक्ष हे शिवसेनेचे आमदार आहेत. आता सोमवारी जेडीसीसीसमोर शिवसेनेच्या होणार्‍या ढोलनाद आंदोलनात सहभागी होण्यावरून साहजिकच या पक्षाचे आमदार तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष किशोर पाटील यांची द्विधा मनःस्थिती होणार आहे. याच पद्धतीने अन्य जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या सहकार्‍यातील नेत्यांची कुचंबणा होण्याची शक्यता आहे. यामुळे या आंदोलनातून क्षणिक लक्ष वेधण्याच्या पलीकडे फारसे काही साध्य होणार नसल्याची बाब उघड आहे. कोणत्याही स्थितीत भाजपला विरोध करण्याचा शिवसेनेचा आक्रमक पवित्रा कायम असल्याचेही यातून स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कधी काळी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याच्या तयारीत असणार्‍या शिवसेनेच्या आंदोलनांची वाटचाल आता ढोलनादापर्यंत येऊन पोहोचल्याचे यातून दिसून येत आहे. याचा थोड्याफार चर्चेशिवाय फारसा लाभ होणार नसल्याचेही स्पष्ट आहे. याचबरोबर शिवसेनेकडून सातत्याने भाजपला कोंडीत पकडण्याचे जे प्रयत्न होत असतात, त्याचेही विपरीत परिणाम या दोन्ही पक्षांच्या युतीवर होऊ शकतो. शिवसेना याकडेही लक्ष देत नाहीत. सत्तेत राहून मित्रपक्षाच्याच विरोधात कुरघोडी करणे युतीला परवडणारे नाही, हेही यानिमित्ताने शिवसेनेने लक्षात घ्यायला हवे. अन्यथा केवळ अभिनव आंदोलन करणारी शिवसेना दखलपात्र उरणार नाही.