दोन्ही निवडणुकांची एकत्र तयारी करण्याचे आदेश!
हे देखील वाचा
मुंबई :आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक शिवसेना स्वबळावरच लढेल, असा नारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असा आदेशही त्यांनी दिला. मंगळवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिल्याची माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी दिली. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून गोंधळ निर्माण केला जात आहे. यापूर्वी आयोगाने या निवडणुका एकत्र घेता येणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. मात्र, आता आयोग वेगळी भूमिका मांडत आहे, त्यामुळे कधीही निवडणुका झाल्या तर पक्ष तयार असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले.
राज्यातील शिवसेना लोकप्रतिनिधींची आढावा बैठक मंगळवारी मुंबईत घेण्यात आली. यामध्ये आमदार, खासदार, नगरसेवकांसह सर्व शिवसैनिकांना जनसंपर्क वाढवण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुखांनी दिला आहे. तसेच, देशात जर २०१९च्या आधीच लोकसभेची निवडणूक झाली तर, त्यासाठी पक्षाची तयारी कशी असेल, याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला असल्याचे कायंदे यांनी सांगितले. देशात लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका एकत्र घेता येतील का, याबाबत थोडी शंका आहे, त्यातच केंद्राच्या इशाऱ्यावर चालल्यासारखे निवडणूक आयोग रोज आपले म्हणणे बदलत आहे. तर, या निवडणुका केवळ देशात दोनच व्यक्तीला हव्या असल्याचे सांगत खासदार अरविंद सावंत यांनीही मोदी-शहा यांच्यावर टीका केली.