शिवसेना कार्य प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अचानक शिवसेना नेते, खासदार आणि आमदारांची इन कॅमेरा बैठक मातोश्रीवर घेतली.शिवसेना कार्य प्रमुख स्वतः केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर नाराज आहेत ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. पण ही बैठक सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासाठी आहे, अशा बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या गेल्या. एवढे धैर्य उद्धव यांच्याकडे असते, तर हे सरकार कधीच पडले असते. मुळात उद्धव ठाकरे हे जोपर्यंत काही भूमिका घेत नाहीत तोपर्यंत भाजपचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांना सहन करावा लागणार.
खर म्हणजे ही बैठक चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांच्यामुळे उद्धव ठाकरेंना घ्यावी लागली. गेल्याच आठवड्यात तुकाराम कातेंनी माध्यमांसमोर सर्व शिवसेना आमदारांचा आवाज उठवला. भाजप सोडा पण शिवसेनेचे मंत्रीच सेना आमदारांची कामे करत नाहीत, अशी तक्रार त्यांनी माध्यमांसमोर करताच शिवसेना नेतृत्वाला जाग आली. सर्व आमदारांचे दुःख कातेंनी बोलून दाखवल्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही आयतीच संधी चालून आली. ही बैठक म्हणजे एक दबावतंत्राचा भाग होता. एका बाजूला भाजपवर दबाव आणायचा आणि दुसर्या बाजूला स्वपक्षीय मंत्र्यांना वठणीवर आणायचे. मातोश्रीची ही जुनी पद्धत आहे. या बैठकीत आमदारांनी बरीच उणीदुणी काढली. परंतु, या बैठकीत काही निष्पन्न झाले का? फक्त उद्धव ठाकरे यांनी आपल्याच मंत्री आणि आमदारांची भांडणे एन्जॉय केली व बाहेर जाऊन संजय राऊत यांनी न घडलेल्या गोष्टींबाबत ट्वीट केले. माध्यमांनीही न घडलेल्या गोष्टी चालवल्या. मुळात शिवसेना सरकारमध्ये सामील होऊन डिसेंबरमध्ये तीन वर्षे होतील. या तीन वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांचा ताळेबंद उद्धव ठाकरे यांनी पाहिला का? उद्योगमंत्री सुभाष देसाई हे विधानसभेत पडले तरी मंत्री झाले. यांच्याकडे कधी शिवसैनिक जातात का? गेल्यावर काम सोडा ते हसतात तरी का? याची विचारणा आमदारांकडे कडे केली, तरी त्यांना सत्य परिस्थिती समजेल. दुसरे मंत्री दिवाकर रावते हे तर आमदार गेले तरी त्यांच्यावर खेकसतात. त्यामुळे सामान्य शिवसैनिक तेथे फिरकतही नाही. तिसरे मंत्री दीपक सावंत यांनी आरोग्य विभागात एवढी क्रांती केली की त्यांचा सर्व स्टाफच त्यांना सोडून गेला. त्यांच्या कामगिरीमुळे गोरखपूर प्रकरणाची पुनरावृत्ती नाशिकमध्ये घडली. तिसरे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नव्हे, तर ठाण्याचे मंत्री वाटतात. हे कॅबिनेट मंत्री मंत्रालयात क्वचितच भेटतात. राज्यमंत्री मात्र सर्व अॅक्टिव्ह आहेत. अधिकार नसूनही कामे करण्यासाठी धडपडत असतात. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर हे सतत शिवसेनेला अपेक्षित असलेल्या वर्गासाठी बैठका, पाहणी दौरे करत असतात. ते एकमेव मंत्री असे आहेत त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम सकाळीच समजतो. त्यांच्याकडे शिवसैनिकांचीही वर्दळ असते.गुलाबराव पाटील. दादा भुसे, अर्जुन खोतकर, संजय राठोड, दीपक केसरकर या राज्यमंत्र्यांकडे शिवसैनिकांची गर्दी दिसते.राणेंची परतफेड
नारायण राणे यांनी नेहमीप्रमाणे बंडाचा झेंडा रोवला आहे. पक्ष सोडताना शक्तिप्रदर्शन करतात तसे सोमवारी शक्तिप्रदर्शन राणेंनी केले. याचा अर्थ भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला असावा, ज्या नारायण राणे यांना अशोक चव्हाण यांनी राजकीय जीवदान दिले त्यांच्यावर राणे पितापुत्रांनी तोंडसुख घेतले. काँग्रेस संपवण्याची भाषा करणार्या राणे यांना अशोक चव्हाण यांनी पक्षात पुन्हा घेऊन मंत्रिपद दिले. त्यावेळी अशोक चव्हाण यांना बेरजेचे राजकारण करायचे होते आणि आपले विरोधक विलासराव देशमुख यांना शह द्यायचा होता.अशोक चव्हाण यांनी राणे यांच्यासाठी दिल्लीत मध्यस्थी केली. पुन्हा उद्योग मंत्रिपद दिले.
सन्मान दिला, तरीही ते उलटलेच. राणे यांच्या मोठ्या मुलाला खासदारकीचे तिकीट, दुसर्या नितेशला आमदारकीचे तिकीट आणि राणे दोन विधानसभा मतदारसंघोत पडूनही पुन्हा विधानपरिषद देऊनही राणेंचे काँग्रेसमध्ये खच्चीकरण झाले, असे राणे व त्यांचे दोन्ही पुत्र म्हणतात. अशोक चव्हाणांनी राणेंसाठी दोनवेळा दिल्लीत रदबदली केली. एकदा काँग्रेसमधून निलंबनानंतर 52 दिवसांत पुन्हा काँग्रेसमध्ये आणून मंत्री केले व दोनदा पडून विधानपरिषद मिळवून दिली. त्याचे फळ अशोक चव्हाण यांना मिळाले.
– नितीन सावंत
सहसंपादक, जनशक्ति
9892514124