शिवसेनेचा मराठी बाणा; सर्व खासदार मराठीत शपथ घेणार

0

मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. महाराष्ट्रातून ४१ खासदार महायुतीचे निवडून गेले आहे. यात शिवसेनेचे १८ खासदार आहेत. येत्या ३० में रोजी पंतप्रधान आणि त्यांचा मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर सर्व खासदारांचा शपथविधी होईल. दरम्यान महाराष्ट्रातील शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून शपथ घेणार आहे. कल्याणचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत प्रथमच मतदारांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून शपथ घेणार असल्याची माहिती दिली.

शिवसेना ही मराठी अस्मितेवर चालणारी संघटना असून शिवसेनेने नेहमीच मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी लढा दिला आहे. मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेना नेहमीच संवेदनशील असते. दरम्यान सोशल मीडियावर #मराठीतशपथ अशा हॅशटॅग ट्रेण्ड होत असून महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी अशी मागणी होत आहे. शपथ घेताना खासदारांना भाषेचा पर्याय असतो. आपल्या मातृभाषेत शपथ घेण्याचा पर्याय खासदारांना दिला जातो. त्यामुळे शपथविधीत महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार कोणत्या भाषेत शपथ घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.