शिवसेनेचा महापौर झाला, तर आनंदच : नांदगावकर

0

पुणे : मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाला तर आनंदच होईल. माझं कुळ आणि मूळ तेच आहे, अशी सूचक प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी बुधवारी येथे व्यक्त केली. त्यामुळे मुंबईत मनसे व शिवसेेनेच्या युतीची शक्यता बळावल्याचे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

वाडेश्वर कट्ट्यावर अनौपचारिक गप्पांत ते बोलत होते. मुंबई महापालिकेत शिवसेना आणि मनसेची युती हाणार का, असा प्रश्‍न केला जात आहे. मनसे नेहमीच मराठी माणसाच्या हिताचा विचार करते, असे सांगत अशा युतीची शक्यता असल्याचेही नांदगावकर यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. बुधवारी यांनी तीच भूमिका कायम ठेवली. मुंबईत शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी मनसे मदत करणार का, असे विचारता नांदगावकर म्हणाले, शिवसेनेचा महापौर झाला तर आनंदच होईल. माझं कुळ आणि मूळ तेच आहे.

नुकत्याच जालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला राज्यभरात चांगले यश मिळाल्याचीही कबुलीही नांदगावकर यांनी दिली. पंचायत समिती ते लोकसभा असे एकच सरकार असावे म्हणून मतदारांनी भाजपला मते दिली, हे मान्य करावे लागेल, असे ते म्हणाले. मात्र, यंदा ईव्हीएम मशिनबाबतही अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही नांदगावकर यांनी केली.