शिवसेनेचा यु टर्न

0

मुंबई । दलित मतांच्या राजकारणासाठी भाजपकडून राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे करण्यात आल्याची टीका शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली. त्यास 24 तासांचा अवधी उलटत नाही. तोच शिवसेनेने यु टर्न घेत भाजपने जाहीर केलेले एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार कोविंद यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी केली. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेना पुन्हा भाजपची राजकिय कोंडी करणार असल्याची शक्यता मावळली आहे.

वांद्रे येथील निवासस्थानी शिवसेना नेत्यांची बोलाविलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उध्दव ठाकरे यांनी वरील घोषणा केली. याबैठकीला शिवसेना नेते संजय राऊत, मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते आणि रामदास कदम आदी हजर होते.

हिंदू राष्ट्रासाठी राष्ट्रपती पदासाठी सुरूवातीला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव शिवसेनेकडून पुढे करण्यात आले होते. मात्र त्यास भाजपमधूनच अडचण असल्याने शेतकर्‍यांच्या भल्यासाठी म्हणून कृषीशास्त्रज्ञ डॉ.एम.एस. स्वामीनाथन यांचे नाव पुन्हा भाजपला सांगण्यात आले होते. परंतु स्वामीनाथन यांच्याशी काल चर्चा झाल्यानंतर त्याची प्रकृती चांगली रहात नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचे नाव आम्ही मागे घेतले. शेवटी आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत, आणि कोविंद हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना नेत्यांच्या बैठकीत आज घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

परंतु राष्ट्रपती पदासाठी आजही मोहन भागवत आणि स्वामीनाथन यांचे नाव शिवसेनेकडून कायम असल्याचे स्पष्ट करत भविष्यकाळात कोविंद यांनी चांगला राज्य कारभार करावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीच्या निमित्ताने भाजपाध्यक्ष अमित शाह हे भेटीस आले होते. तसेच नाव निश्चित झाल्यानंतर शाह यांचा फोनही आला होता. त्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांना सांगितल्यानुसार निर्णय घेतल्याची ठाकरे यांनी सांगितले. तसेच शिवसेना फक्त भाजपला विरोधासाठी विरोध करत नाही. तर ज्या ठिकाणी पटत नाही. त्या ठिकाणी विरोध करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.