शिवसेनेचा शहरप्रमुख आज ठरणार?

0

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पदाधिकार्‍यांची बैठक घेणार; चिंचवडे, उबाळे, बाबर यांची नावे चर्चेत
पिंपरी-चिंचवड: शिवसेनेने महाराष्ट्रभर संघटनात्मक पातळीवर फेरबदल सुरू केले आहेत. पुण्याचे शहरप्रमुखही बदलले आहेत. पिंपरी-चिंचवडचे शहरप्रमुखही बदलले जाणार आहेत. त्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे गुरूवारी पुण्यात आले आहेत. ते सर्व पिंपरी-चिंचवडच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन शहरप्रमुखाच्या नावाची घोषणा करणार आहेत. पुण्यासाठी दोन शहरप्रमुख निवडण्यात आल्यामुळे पिंपरी-चिंचवडला एकच शहरप्रमुख असणार की विधानसभा मतदारसंघनिहाय तीन शहरप्रमुख निवडले जाणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

शहरप्रमुख एक की तीन हीच उत्सुकता
पिंपरी-चिंचवडच्या शहरप्रमुखपदी कोणाची निवड केली जाते, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. शहरप्रमुखपदासाठी गजानन चिंचवडे यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय योगेश बाबर, रामभाऊ उबाळे यांचीही नावे चर्चेत आहेत. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे पिंपरी-चिंचवडसाठी या तिघांपैकी एकाचीच शहरप्रमुखपदी निवड करतात की पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीन विधानसभा मतदारसंघनिहाय तीन शहरप्रमुखांची निवड करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.